यंत्रणेला तीन दिवस गुंगारा देणारा गवा अखेर सांगली शहरात दाखल | पुढारी

यंत्रणेला तीन दिवस गुंगारा देणारा गवा अखेर सांगली शहरात दाखल

सांगली ; पुढारी वृत्‍तसेवा

गेल्या तीन दिवसापासून वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाला गुंगारा देणारा गवा सर्वांना चकवा देत अखेर सांगली शहरांमध्ये आलाच. सध्या त्याने सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट यार्ड परिसरात ठाण मांडले असून त्याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणांची तारांबळ उडाली आहे.

शनिवारी (दि. २४) रोजी रात्री गवा सांगलीवाडी मध्ये आला होता. सांगली – इस्लामपूर रस्त्यावर गव्याचे दर्शन होताच तो शहरात घुसूनये यासाठी नागरिक आणि यंत्रणेने आटोकाट प्रयत्न केले. परंतु सुरुवातीला सांगलीवाडीतील चिंचबाग आणि त्यानंतर कदमवाडी रस्त्यावरील एका उसाच्या शेतामध्ये गव्याने आश्रय घेतला होता. उसाच्या शेतातून गवा गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सोमवारी तो पुन्हा सांगलीवाडी मधील काही नागरिकांना आढळून आला होता. त्यामुळे पुन्हा गव्याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणांची पळापळ सुरू झाली होती. परंतु गवा सलग तीन दिवस उसाच्या शेतामध्ये आश्रय घेऊन आला होता. मध्यरात्री मात्र त्याने सर्वांना चकवा देत सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आला आहे.

सध्या तो एका चिंचोळ्या गल्लीमध्ये असून तो तिथून बाहेर पडू नये यासाठी बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. गोंधळ निर्माण झाल्यास गवा सैरभैर होऊ शकतो. यासाठी त्याला पाहण्यासाठी कोणी येऊनये व गोंधळ करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्‍या आठवड्यात कोल्‍हापूर शहरातील रहिवासी भागात गवा आल्‍याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एका नागरिकाचा मृत्‍यू झाला होता. तर काही लोक जखमीही झाले होते. वनविभागाने नागरी वस्‍तीतून गव्याला बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरू केली होती.

Back to top button