

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनने (R Ashwin Help) शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला मुंबईतील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विक्रमी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यात एजाज पटेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात सर्व १० बळी घेत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणारा एजाज जगातील तिसरा गोलंदाज ठरला.
एजाज पटेलने मुंबई कसोटीत चमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात १० आणि दुस-या डावात ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे एका सामन्यात १४ विकेट्स मिळवून त्याने सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले. अशी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याच्या ट्विटर अकाउंटला ब्लू टीक मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक युझर्सना आश्चर्य वाटले. अशा परिस्थितीत भारताचा रविचंद्रन अश्विनने एजाज पटेलला मदतीचा हात पुढे केला. त्याने एजाजला ब्लू टिक मिळवून दिले.
आर अश्विनने व्हेरीफाईड ब्ल्यू बॅज सोर्स पेजला ट्वीट करून सांगितले की, जो खेळाडू एका डावात सर्व १० विकेट घेतो तो निश्चितपणे ब्लू टिकला पात्र आहे. अश्विनच्या या ट्विटशी अनेकांनी सहमती दर्शवली. ट्विटरनेही याची दखल घेत एजाज पटेल यांचे ट्विटर अकाउंटला ब्लू टिक दिली. यानंतर अश्विननेही ट्विटरचे आभार मानले.
रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करणे न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी खूप कठीण गेले. त्याने किवी फलंदाजांना जेरीस आणले. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४ आणि दुस-या डावात ४ अशा एकून ८ विकेट घेतल्या. तर एजाज पटेलने दोन्ही डावात मिळून १४ बळी घेतले. भारताच्या पहिल्या डावात १० बळी घेणाऱ्या एजाजने दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. परदेशातील गोलंदाजाची भारताविरुद्धची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पटेलने इयान बॉथम यांचा १३ बळींचा विक्रम मोडला.