IND vs AUS ODI : ‘वनडे’त ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, वर्चस्व राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान

IND vs AUS ODI : ‘वनडे’त ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, वर्चस्व राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया आता वनडे मालिकेत एकमेकांना भिडणार आहेत. पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत दोन्ही संघ 50-50 च्या मालिकेत आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता वनडे मालिकाही जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल.

मात्र, टीम इंडियासाठी कांगारूंचे वनडेतील आव्हान सोपे असणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाचे भारतातील रेकॉर्ड खूप चांगले आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर प्रत्येक आघाडीवर टिकून राहावे लागणार आहे. कारण कांगारूंनी 2019 मध्ये टीम इंडीयाला घरच्या मैदानावरच वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारली होती.

यापूर्वीच्या मालिकेत भारताचा पराभव

2018-19 च्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-2 ने पराभव केला होता. मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले होते. पण पुढचे तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. त्या मालिकेत, उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 2 शतके झळकावून पाच सामन्यांत 383 धावा फटकावल्या होत्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. भारतासाठी विराट कोहलीने पाच सामन्यात 2 शतकांसह 310 धावा केल्या होत्या.

हार्दिक पंड्या पहिल्यांदाच वनडेमध्ये भारताचा कॅप्टन

टीम इंडियाचा नितमीत कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही. तो दुसऱ्या सामन्यातून संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे पहिल्या वनडेसाठी हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अशातच पंड्यासमोर मोठे आव्हान आहे, ज्यावर त्याला कोणत्याही किंमतीत मात करायची आहे. भारतीय संघाने या वर्षात रोहितच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले ज्यात विजयाची नोंद केली आहे. हा विजयाचा धडाका पंड्याला पुढे चालूच ठेवावा लागेल.

वनडे मालिकेत टीम इंडियापुढे 'या' मोठ्या अडचणी

कसोटी मालिकेत फिरकीसाठी अनुकुल खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा स्थितीत भारतीय संघाला फायदा झाला, पण वनडे मालिकेत तसेच घडेल असे सांगता येत नाही. कारण वनडेमध्ये सामना रोमांचक बनवण्यासाठी येथे फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी तयार केली जाऊ शकते, जिथे फिरकीपटूंना टर्न मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाशी कडवा मुकाबला करावा लागेल.

वनडे मालिकेपूर्वी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली असून तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. अलीकडच्या काळात त्याने वनडेतमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे टीम इंडियाला मधल्या फळीतील अय्यरच्या जागी एक चांगला पर्याय निवडावा लागेल.

या वर्षी भारताचा सलग सहा वनडे 'विजय'

टीम इंडियाने या वर्षी आतापर्यंत श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तीन-तीन सामन्यांच्या वनडे सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप दिला आहे. पंड्याने याआधी भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. पण टीम इंडियासाठी तो प्रथमच वनडेमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

वनडेमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची आकडेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये आतापर्यंत 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 53 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 10 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 29 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

'या' खेळाडूंच्या सर्वाधिक धावा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सक्रिय फलंदाजांपैकी रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 40 सामन्यांमध्ये 61.33 च्या सरासरीने आणि 93.87 च्या स्ट्राइक रेटने 2,208 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे, ऑस्ट्रेलियाच्या सक्रिय फलंदाजांमध्ये स्मिथने भारताविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 21 सामन्यांमध्ये 62.38 च्या सरासरीने आणि 105.05 च्या स्ट्राइक रेटने 1,123 धावा केल्या आहेत. (IND vs AUS ODI)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे : सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर : 71 सामने : 3077 धावा : 44.59 सरासरी
रोहित शर्मा : 40 सामने : 2208 धावा : 61.33 सरासरी
रिकी पाँटिंग : 59 सामने : 2164 धावा : 40.07 सरासरी
विराट कोहली : 43 सामने : 2083 धावा : 54.81 सरासरी
एमएस धोनी : 55 सामने : 1660 धावा : 44.86 सरासरी

रोहितच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2013-14 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 491 धावा केल्या होत्या.

'या' खेळाडूंच्या सर्वाधिक विकेट

सक्रिय भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने दोन्ही संघांच्या वनडे सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 19 सामन्यात 6.13 च्या इकॉनॉमीसह 29 बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे अॅडम झाम्पा हा भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 16 सामन्यात 5.64 च्या इकॉनॉमीसह 27 विकेट घेतल्या आहेत. कमिन्सने (14 विकेट) दोन्ही संघांमधील वनडे मालिकेत (5 सामन्यांची मालिका, 2018-19) सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. (IND vs AUS ODI)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे : सर्वाधिक विकेट्स

ब्रेट ली : 32 सामने : 55 विकेट
कपिल देव : 41 सामने : 45 विकेट
मिचेल जॉन्सन : 27 सामने, 43 विकेट
स्टीव्ह वॉ : 53 सामने, 43 विकेट
अजित आगरकर : 21 सामने, 36 विकेट

भारतीय खेळाडू 'हे' मोठे विक्रम करू शकतात

विराट कोहली (12,809) वनडे क्रिकेटमध्ये 13,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. अगामी वनडे मालिकेत त्याची बॅट तळपली तर तो अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. रोहित वनडेत 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 18 धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत 241 सामन्यात 9,782 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा (2,247) वनडेमध्ये 2,500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 53 धावा कमी आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल (121 विकेट) हा जसप्रीत बुमराह (121) आणि रवी शास्त्री (129) यांना विकेट्सच्या बाबतीत मागे राहू शकतात.

ऑस्ट्रेलियन खेळाडू 'हे' विक्रम करू शकतात

स्मिथ (4,917) वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. अशी कामगिरी करणारा तो 17वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरणार आहे. ट्रॅव्हिस हेड (1,823) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा पार करू शकतो. जर तो यात यशस्वी झाला तर तो मॅथ्यू वेड (1,867) आणि किम ह्यूज (1,968) यांना मागे टाकेल. ॲडम झाम्पा (127) माजी अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स (133) यांना मागे टाकू शकतो. असे केल्यास तो या वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 13वा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news