

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND Vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. 9 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमधील पहिला सामना नागपुरात सुरू होणार असून दोन्ही संघ विजयाच्या तयारीत व्यस्त आहेत. यासोबतच प्लेइंग इलेव्हन आणि बॅटिंग कॉम्बिनेशन, बॉलिंग कॉम्बिनेशन यावरही सल्लामसलत सुरू आहे. टीम इंडियासाठी खासकरून त्याची बॅटिंग लाइनअप सेट करणे हे आव्हानत्मक झाले आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर टीम इंडिया त्याच्या पर्यायाच्या शोधात आहे.
श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. संघात त्याची जागा घेण्यासाठी खेळाडूंची कमतरता नाही. शुभमन गिल, सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज लाईनमध्ये उभे आहेत. गिल अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय ते टी-20 मध्ये शतक झळकावून त्याने स्वतःला प्रबळ दावेदार घोषित केले आहे. मात्र, गिलला संधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून तो कसोटी संघात आल्यास त्याची फलंदाजी कशी असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुभमन गिलने कसोटी सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही गिलने काही चांगल्या खेळी खेळल्या पण हा खेळाडू या फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला. गिलची कसोटीतील सरासरी केवळ 32 आहे. गिलच्या फॉर्मचा विचार केल्यास त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य होणार नाही.
सध्या रोहित आणि राहुल कसोटीत ओपनिंग करतात. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत गिलला सलामीला पाठवले जाईल का? असा प्रश्न निर्माण होतो. सलामीवीर म्हणून राहुलची कामगिरी काही खास नाही. त्याची कसोटीतील सरासरी 35 पेक्षा कमी आहे. दुसरीकडे गिलचा सध्याचा उत्कृष्ट फॉर्म लक्षात घेऊन टीम इंडिया राहुलला डच्चू देईल का? राहुलला मधल्या फळीत खेळवले जाणार का? असेही सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केले आहे.
रिपोर्ट्सनुसार, गिलला मधल्या फळीत खेळवले जाईल अशीही चर्चा झाली आहे. ऑस्ट्रेलिया-ए दौऱ्यावर त्याने मधल्या फळीतच द्विशतक ठोकले होते. गिल फिरकीचा सामना उत्तमरित्या करू शकतो, त्यामुळे या खेळाडूचा तिथेही योग्यपद्धतीने वापर करता येऊ शकतो. या सगळ्यात सूर्यकुमार यादवचे काय होणार, हे येणारा काळच सांगेल.
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.