

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून धमाकेदार सुरुवात होत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जाणार असून दोन्ही संघांच्या तयारीला आणखी वेग आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हे पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपापल्या संघाचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, हिटमॅन रोहित एक नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
रोहित शर्मा हा टीम इंडियाचा सध्याचा नियमीत कर्णधार आहे. अनेक वर्षांपासून तो तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. दरम्यान, विराट कोहली तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळत होता, त्यावेळी रोहितला कर्णधारपदाची संधी मिळाली, पण तो नियमित कर्णधार नव्हता. रोहित शर्मा गेल्या दीड वर्षांपासून नियमित कर्णधार आहे. पण गेल्या वर्षाच्या अखेरीस जेव्हा टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर गेली तेव्हा रोहितला अचानक दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि चेतेश्वर पुजारा उपकर्णधार झाला. मात्र आता रोहित सलग चार सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
दरम्यान, कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा भारताचा पहिला कर्णधार बनू शकतो, आजपर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून अनेक शतके झळकावली, मात्र आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याला शतक झळकावता आले नाही. आशिया चषक 2022 मध्ये, त्याने अफगाणिस्तानविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु तो तेव्हा कर्णधार नव्हता. तसे पाहता, कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणे किती अवघड असते, हे यावरूनच समजू शकते.
आतापर्यंत जगातील केवळ तीन कर्णधारांनाच असे करता आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी आणि श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान. आता रोहित शर्माला या यादीत त्याचे नाव नोंदवण्याची संधी आहे.
हिटमॅन रोहितने आतापर्यंत 45 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आठ शतके आणि 14 अर्धशतके आहेत. पण कर्णधार असताना त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. रोहितने 2 सप्टेंबर 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत शेवटचे कसोटी शतक फटकावले होते. त्या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितच्या बॅटमधून फक्त 11 धावा निघाल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यात त्याने 127 धावा तडकावल्या होत्या. पण त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता. त्या सामन्यानंतर रोहित दोनच कसोटी खेळला आहे. 4 सप्टेंबर 2022 रोजी मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध. त्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित कर्णधार होता. परंतु त्याला शतक सोडा अर्धशतक फटकावता आले नाही. आता तब्बल पाच महिन्यांनंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, हे पाहावे लागेल.