

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिका फेटाळण्याची विनंती केल्यानंतर उद्या बुधवारी राज्यातील राजकीय स्थितीवर न्यायालय महत्वाची सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ राज्यातील सत्तासंघर्षासंबंधी दाखल सर्वच याचिकांवर एकत्रित सुनावणी घेईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कुणाचा ? यावर निर्णय घेण्यास मनाई आदेश जारी करण्याचे विनंती ठाकरे गटाने केली आहे. परंतु, शिंदे गटाने देखील शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून अंतरिम आदेश दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल आहेत, त्यात सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाने दिलेले आव्हान, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी दिलेले निमंत्रण व बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली संधी, याला शिवसेनेने दिलेले आव्हान, विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल असलेली याचिका, शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून अजय चैधरी यांची नियुक्ती रद्द करण्याला देण्यात आलेले आव्हान, शिंदे यांच्या गटनेते तसेच भरत गोगावले यांच्या प्रतोद पदावरील निवडीला ठाकरे गटाने दिलेले आव्हान, राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील गटनेते पदावरून लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाने दिलेले आव्हान आदी याचिकांचा समावेश आहे. अशात विधानसभेसह लोकसभेतील कार्यवाहीसंबंधी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?