ICC Rankings : सूर्याचे मोठे नुकसान! शुभमन गिलची झेप
पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. तर शुभमन गिल करिअरमधील सर्वोत्तम 30 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्याच्या खात्यात 906 रेटिंग जमा झाले आहेत. नव्या क्रमवारीत त्याला दोन रेटींगचे नुकसान झाले आहे.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके फटकावणारा गिल वनडेमध्ये सहाव्या आणि कसोटीत 62व्या स्थानावर आहे. त्याने आपल्या स्फोटक कामगिरीने 168 स्थानांची लांब उडी घेतली आहे. गिल यापूर्वी आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 100 मध्येही नव्हता. त्याने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक झळकावले. त्यानंतर वनडेमध्येही शतकी खेळी साकारली होती. (ICC Rankings)
भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी-20 क्रमवारीत खूप फायदा झाला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. हार्दिकला न्यूझीलंडविरुद्धच्या त्याच्या प्रभावी कामगिरीचा फायदा झाला असून तो आता अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पंड्याच्या खात्यात 250 तर अव्वलस्थानी असणा-या शाकिब अल हसनचे 252 गुण आहेत. पंड्या व्यतिरिक्त, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गोलंदाजी क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. तो कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये एकही भारतीय नाही. (ICC Rankings)
विराट कोहलीची घसरण
विराट कोहली एक स्थान घसरून 15व्या, तर केएल राहुल दोन स्थानांनी घसरून 27व्या आणि कर्णधार रोहित शर्मा 29व्या स्थानावर आहे. इशान किशन तीन स्थानांनी घसरून 48व्या स्थानावर आला आहे. भुवनेश्वर कुमार एका स्थानाने घसरून 21व्या स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल अनुक्रमे 29व्या आणि 30व्या स्थानावर आहेत.
वनडे फलंदाजी क्रमवारीत बाबर अव्वल स्थानी
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही फायदा झाला आहे. 131 धावांची खेळी करणाऱ्या जोस बटलरला सहा स्थानांचा फायदा झाला असून तो 20 व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलाननेही शानदार फलंदाजी करत बटलरसोबत 232 धावांची भागीदारी केली. त्याला 31 स्थानांचा फायदा झाला असून तो 58 व्या स्थानावर पोहोचला आहे.
दुखापतीतून पुनरागमन करणा-या जोफ्रा आर्चरने 40 धावांत 6 बळी घेतले. 2020 नंतर पहिली वनडे खेळणाऱ्या आर्चरला उत्कृष्ट कामगिरीचा लाभ मिळाला. एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याने 13 स्थानांची झेप घेत 22व्या स्थान गाठले.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने 62 चेंडूत 80 धावा केल्या. तो 42 व्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये भारताचा मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे.

