WTC Final Date : आयसीसीची मोठी घोषणा! WTC च्या फायनलची तारीख जाहीर | पुढारी

WTC Final Date : आयसीसीची मोठी घोषणा! WTC च्या फायनलची तारीख जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final Date : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. आयसीसीने बुधवारी या सामन्याची तारखी जाहीर केली. पाऊस किंवा इतर कारणांमुळे खेळ खराब झाल्यास 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला असल्याचेही आयसीसीने सांगितले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलनुसार ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघही फायनलच्या शर्यतीत असले तरी या दोन संघांचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग खूपच खडतर आहे.

गतवर्षी न्यूझीलंडने साउथहॅम्प्टन येथे 2021 च्या फायनलमध्ये भारतावर 8 गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले होते. त्या सामन्याचा निकाल राखीव दिवशीच लागला होता.

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची जागा पक्की (WTC Final Date)

सध्या, ऑस्ट्रेलिया 75.56 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कांगारूंनी अंतिम फेरीत आपली जागा जवळपास पक्की केली आहे. त्यानंतर 58.93 गुणांच्या टक्केवारीसह भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौ-यावर असून ते भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. उद्या 9 फेब्रुवारीपासून नागपुरात मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. या मालिकेतून डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निश्चित होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकाही शर्यतीत

डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत श्रीलंका तिस-या स्थानी आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 53.33 आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका 48.72 टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी आहे. श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने-सामने येतील.

डब्ल्यूटीसीचे उर्वरित वेळापत्रक :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिली कसोटी) : 9 ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरी कसोटी) : 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीसरी कसोटी) : 1 ते 5 मार्च (धर्मशाला)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथी कसोटी) : 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (पहिली कसोटी) : 28 फेब्रुवारी ते 4 मार्च (सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (दुसरी कसोटी) : 8 ते 12 मार्च (जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका)
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (पहिली कसोटी) : 9 ते 13 मार्च (ख्राइस्टचर्च, न्यूझीलंड)
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (दुसरी कसोटी) : 17 ते 21 मार्च (वेलिंग्टन, न्यूझीलंड)

 

Back to top button