ICC ODI WC 2023 : नऊ ठिकाणे; नवनवी आव्हाने!

ICC ODI WC 2023 : नऊ ठिकाणे; नवनवी आव्हाने!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी फेरीतील आपले 9 सामने प्रत्येक वेळी विभिन्न ठिकाणी खेळणार असून, यामुळे प्रत्येक सामन्यासाठी सातत्याने प्रवासाबरोबरच प्रत्येक वेळी विभिन्न परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान संघासमोर असणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना दि. 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल तर शेवटचा साखळी सामना क्वॉलिफायर-1 संघाविरुद्ध होणार आहे. या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी तूर्तास 8 संघांचा सहभाग निश्चित असून सध्या झिम्बाब्वेत सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून आणखी दोन संघ पात्र ठरणार आहेत. (ICC ODI WC 2023)

दरम्यान, देशातील कानाकोपर्‍यातील शहरातील क्रिकेटप्रेमींना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहता यावा, यासाठी भारताचे साखळी फेरीतील सर्वही सामने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले असले तरी, यामुळे संघाला सातत्याने प्रवास करावा लागेल, हे निश्चित झाले आहे. (ICC ODI WC 2023)

8 ऑक्टोबर

भारत वि.ऑस्ट्रेलिया

ठिकाण : चेन्नई

सामन्याची वेळ : दु.2 वा.

चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भारताचा पहिला सामना होणार असून पहिल्याच लढतीत वन-डे विश्वचषकातील आजवरचा सर्वात यशस्वी ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ भारताचा प्रतिस्पर्धी असणार आहे. यंदा मार्च महिन्यात याच ठिकाणी वन-डे लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला 21 धावांनी पराभूत केले होते. (ICC ODI WC 2023)

खेळपट्टी : मजबूत व कोरडी खेळपट्टी असते. फिरकीपटूंना बरीच पोषक स्थिती. ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाजांची कामगिरी कशी होईल, यावर बरेच काही अवलंबून असेल.

सर्वोच्च वन-डे धावसंख्या : 5 बाद 327 -पाकिस्तान-भारताविरुद्ध (1997)

भारताची चेन्नईतील सर्वोच्च धावसंख्या : 8 बाद 299 वि. द. आफ्रिका (2015).

चेन्नईतील भारताचे वन-डे रेकॉर्ड : सामने : 14, विजय : 7, पराभव : 6, निकाल नाही : 1

11 ऑक्टोबर

भारत वि. अफगाणिस्तान

ठिकाण : दिल्ल्ली

सामन्याची वेळ : दु.2 वा.
भारताची स्पर्धेतील दुसरी लढत राजधानीत होत आहे. अफगाण संघातील काही खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने येथे खेळले असून या अनुभवाचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघ या लढतीत फेव्हरिट मानला जातो.

खेळपट्टी : विशेषत: पहिल्या डावात फलंदाजीला पोषक. येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता अधिक असते.

दिल्लीतील सर्वोच्च वन-डे स्कोअर : 8 बाद 330 विंडीज वि. नेदरलँडस् (2011 विश्वचषक).

दिल्लीत भारताचा सर्वोच्च स्कोअर : 6 बाद 289 वि. ऑस्ट्रेलिया (1987).

भारताची दिल्लीत वन-डे कामगिरी : सामने : 21, विजयी : 13, पराभव : 7, निकाल नाही : 1.

15 ऑक्टोबर

भारत वि. पाकिस्तान

ठिकाण : अहमदाबाद

सामन्याची वेळ : दु.2 वा.

भारत वि. पाकिस्तान ही या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची लढत अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे. अहमदाबाद हे भारतातील सर्वोच्च प्रेक्षक क्षमतेचे मैदान असून, येथे 1 लाख 32 हजार लोक सामावू शकतात. भारताची फलंदाजी व पाकिस्तानची गोलंदाजी कशी होईल, यावर बरेच काही अवलंबून असेल.

खेळपट्टी : या खेळपट्टीवर लाल व काळ्या मातीच्या खेळपट्ट्या आहेत. पाकिस्तानच्या जलद गोलंदाजांना मदत मिळू नये, या उद्देशाने पाटा खेळपट्टी निवडली जाईल, असा होरा आहे.

अहमदाबादेतील सर्वोच्च धावसंख्या : द. आफ्रिका 2 बाद 365 वि. भारत (2010)

अहमदाबादमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या : 6 बाद 315 वि. पाकिस्तान (2005)

भारताचे अहमदाबादमधील वन-डे रेकॉर्ड : सामने : 18, विजय : 10, पराभव : 8.

19 ऑक्टोबर

भारत वि. बांगलादेश

ठिकाण : पुणे

सामन्याची वेळ : दु.2 वा.

2007 आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताला दे धक्का देणार्‍या बांगलादेशचा संघ पुण्यात भारताला नव्याने आव्हान देईल. भारताचा हा साखळी फेरीतील चौथा सामना असणार आहे. फिरकीपटूंच्या कामगिरीवर दोन्ही संघांचे यशापयश अवलंबून असेल, असे संकेत आहेत.

खेळपट्टी : येथील खेळपट्टी संथ स्वरूपाची असून साहजिकच ती फिरकी गोलंदाजीला पोषक असणार आहे. बांगलादेशकडे शकीब हसन, मेहदी हसन मिराज व तैजूल इस्लाम यांच्यासारखे अव्वल फिरकीपटू असल्याने त्यांच्यावर या संघाची मुख्य भिस्त असणार आहे.
पुण्यातील सर्वोच्च वन-डे धावसंख्या : भारत 7 बाद 365 वि. इंग्लंड
2017.

भारताचे पुण्यातील वन-डे रेकॉर्ड : सामने : 7, विजय : 4, पराभव : 3.

22 ऑक्टोबर

भारत वि. न्यूझीलंड

ठिकाण : धर्मशाला

सामन्याची वेळ : दु. 2 वा.

यापूर्वी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या 2019 वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडूनच उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सोसावा लागला होता. त्यामुळे, ही लढत विशेष महत्त्वाची असणार आहे.

खेळपट्टी : येथील खेळपट्टी जलद गोलंदाजीला पोषक असून बाऊन्सदेखील उत्तम असणार आहे. प्रकाशझोतातील सामन्यात दव हा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. भारताला या ठिकाणी किविज जलद गोलंदाजांविरुद्ध विशेष दक्ष राहावे लागेल. काईल जेमिसन, लॉकी फर्ग्युसन प्लेईंग इलेव्हनमध्ये असल्यास धोकादायक ठरू शकतात. (ICC ODI WC 2023)

धर्मशाला येथील सर्वोच्च वन-डे स्कोअर : भारत 6 बाद 330 वि. विंडीज (2014)

भारताचे धर्मशाला येथील वनडे रेकॉर्ड : सामने : 4, विजय : 2, पराभव :

29 ऑक्टोबर

भारत वि. इंग्लंड

ठिकाण : लखनौ

सामन्याची वेळ : दु.2 वा.

भारतासाठी हा आणखी एक कठीण सामना ठरू शकतो. विद्यमान विजेता इंग्लंडचा संघ येथे भारताला जोरदार टक्कर देण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंग्लंडचा संघ फिरकी गोलंदाजांना संधी देण्याबाबत काय धोरण स्वीकारेल, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

खेळपट्टी : या मैदानावरील आयपीएलसाठी वापरात आलेल्या खेळपट्ट्यांवर फारशा धावा झाल्या नाहीत. विश्वचषकासाठी मात्र नवी खेळपट्टी असेल.

लखनौमधील सर्वोत्तम वन-डे धावसंख्या : विंडीज 5 बाद 253 वि. अफगाण (2019).

लखनौमध्ये भारताचा सर्वोत्तम स्कोअर : 8 बाद 240 वि. द. आफ्रि का (2022).

भारताचे लखनौतील वन-डे रेकॉर्ड : सामना : 1, विजय : 0, पराभव : 1.

2 नोव्हेंबर

भारत वि. क्वॉलिफायर-2

ठिकाण : मुंबई

सामन्याची वेळ : दु.2 वा.

आपण मुंबईत विश्वचषकाचा एखादा सामना खेळण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे, असे विराट कोहलीने यापूर्वी म्हटले आहे. भारताने याच वानखेडे

स्टेडियमवर 2011 वनडे विश्वचषक जिंकला होता. येथे क्वॉलिफायर -2 संघ हा झिम्बाब्वे किंवा लंका यांच्यापैकी एक असू शकेल.

खेळपट्टी : बहुतांशी वेळा कोरड्या स्वरुपाची खेळपट्टी. उत्तम बाऊन्स असेल. फलंदाजीसाठी उत्तम.

मुंबईतील सर्वोच्च वनडे स्कोअर : द. आफि—का 4 बाद 438 वि. भारत (2015)

मुंबईत भारताचा सर्वोत्तम स्कोअर : 4 बाद 299 वि. श्रीलंका (1987)

मुंबईत भारताचे वनडे रेकॉर्ड

सामने : 20, विजय : 11, पराभव : 9.

5 नोव्हेंबर

भारत वि. द. आफ्रिका

ठिकाण : कोलकाता

सामन्याची वेळ : दु.2 वा.

सिटी ऑफ जॉय नावाने ओळखल्या जाणार्‍या कोलकातामध्ये भारतासाठी विश्वचषकातील ही आणखी एक महत्त्वाची लढत असणार आहे. दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाजांना या मैदानावर खेळण्याचा गाढा अनुभव आहे. इडन गार्डनची खेळपट्टी जलद गोलंदाजांना पोषक ठरू शकते. भारतीय संघ धावांचा पाठलाग करत असेल तर प्रकाशझोतातील फलंदाजी आव्हानात्मक ठरू शकते.

खेळपट्टी : लाईन अँड लेंग्थवर उत्तम मारा करणार्‍या गोलंदाजांना ही खेळपट्टी पोषक ठरू शकते. सेट झालेले फलंदाज मात्र धावांची आतषबाजी करू शकतात. पहिल्या डावात फलंदाजी करणार्‍या संघाला पोषक वातावरण असू शकते.

कोलकात्यातील सर्वोच्च धावसंख्या : भारत 5 बाद 404 वि. श्रीलंका (2014).

कोलकात्यात भारताचे वन-डे रेकॉर्ड

सामने : 22, विजय : 13, पराभव : 8, निकाल नाही : 1.

11 नोव्हेंबर

भारत वि. क्वॉलिफायर 1

ठिकाण : बंगळूर

सामन्याची वेळ : दु.2 वा.

या लढतीत क्वॉलिफायर 1 हा भारताचा प्रतिस्पर्धी संघ असेल आणि ही लढत त्यामुळे झिम्बाब्वे किंवा श्रीलंका यांच्यापैकी एकाविरुद्ध असू शकते. प्रतिस्पर्धी कोणीही असेल तरी भारतीय संघाने येथे सहज बाजी मारणे अपेक्षित आहे.

खेळपट्टी : सीमारेषा छोट्या आहेत. त्यामुळे येथील सामने नेहमी मोठ्या धावसंख्येचे होतात. त्यातही खेळपट्टी प्रतिकूल असेल तर गोलंदाजांची ही लिटमस टेस्टच ठरू शकते.

बंगळुरातील सर्वोच्च वन-डे स्कोअर : भारत 6 बाद 383 वि. ऑस्ट्रेलिया (2013)

भारताचे बगळुरातील वन-डे रेकॉर्ड : सामने : 21, विजय : 14, पराभव : 5, निकाल नाही : 1., टाय : 1

अरुण जेटली स्टेडियमचे लवकरच नूतनीकरण

यंदा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेतील 5 सामने खेळवले जाणार असून त्यासाठी स्टेडिमयचे नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणासाठी 20 ते 25 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली. यंदा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर दुसरी कसोटी खेळवली गेली; पण मूलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याने त्यावेळी येथे बरीच टीका झाली होती. आता दिल्लीला 5 सामन्यांचे आयोजन करण्याची संधी दिली गेल्याबद्दल दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव राजन मंचंडा यांनी बीसीसीआयचे आभार मानले असून आयोजनात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 35 हजार आहे, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या शहरांना वगळल्याने आश्चर्य

यंदा आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना आयोजित करण्याची संधी मिळाली नसल्याने अनेक शहरांतील संघटनांची निराशा झाली आहे. यात मोहाली, इंदोर, राजकोट, रांची व नागपूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या या स्पर्धेसाठी हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळूर, मुंबई व कोलकाता यांची निवड करण्यात आली आहे. एरव्ही, मेट्रो शहरांना विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर झोननिहाय सामने आयोजित केले जातात. बहुतांशी वेळा आयसीसी यजमान आयोजन समितीला सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्याचे सर्वाधिकार बहाल करते. त्यामुळे साहजिकच येथे यंदा बीसीसीआयकडे हे सर्वाधिकार होते.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news