

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुमारे 1,300 कि.मी. जुन्या पाणीपुरवठा पाईपलाईन असून, राज्यातील 90 टक्के जुन्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्या बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत, सुमारे 10 टक्के ते 15 टक्के जलवाहिन्या बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या वाहिन्या बदलण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिली.
राज्यभरातून अनेक जलवाहिन्या फुटल्याच्या तक्रारी येत असल्या तरी, संपूर्ण मुख्य जलवाहिन्यांचे जाळे बंद करून संपूर्ण वाहिन्या बदलणे शक्य नाही. राज्याला 38 टक्के नॉन-रेव्हेन्यू पाणी किंवा जुन्या जलवाहिनी पुरवठा साखळीतून पाणी कमी होण्याच्या समस्येचा सामना सध्या करावा लागत आहे. राज्यातील संपूर्ण जलवाहिनीचे जाळे बदलण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 300 कोटींहून अधिक खर्च येणार आहे. अशी माहिती उत्तम पार्सेकर यांनी दिली.
दरम्यान, हर घर जल मिशन अंतर्गत घरांना 100 टक्के पाणीपुरवठा जोडणी मिळवून देणारे घोषित झालेले गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. तरीही, गोव्याला त्याच्या मागणीच्या तुलनेत सुमारे 85 एमएलडी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तुटवडा सध्या जाणवत आहे.