

मुंबई : पुढारी ऑनलाईन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भेटीने खळबळ उडालीय. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या परमबीर सिंग आणि सचिन वाझेंच्या भेटीबाबत मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. यावर नियमांप्रमाणे कारवाई होईल, असे वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले आहे.
चांदिवाल आयोगासमोर चौकशीसाठी जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात भेट झाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना १०० कोटीं रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांवरुन राज्य शासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे.
चांदिवाल आयोग गेले काही दिवस सचिन वाझे याची चौकशी करत आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्याने गेले काही महिने अज्ञातवासात गेलेले परमबीर सिंग हे मुंबईत दाखल झाले. आयोगाने त्यांनाही सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.
आयोगाच्या सुनावणीसाठी परमबीर काल सोमवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यामुळे काही वेळ त्यांनी कार्यालयात बसून घालवला. त्यानंतर ते आयोगासमोर हजर झाले. यावेळी वाझेसुद्धा आयोगासमोर हजर झाला होता. याच दरम्यान दोघांनाही निवांत वेळ मिळाला. आयोगाच्या बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये या दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी सुरक्षारक्षक किंवा अन्य कोणीही या खोलीत नव्हते.