परमबीर सिंग आणि सचिन वाझेंच्या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू - पुढारी

परमबीर सिंग आणि सचिन वाझेंच्या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : चांदिवाल आयोगासमोर चौकशीसाठी जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या झालेल्या भेटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना 100 कोटीं रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांवरुन राज्य शासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे.

चांदिवाल आयोग गेले काही दिवस सचिन वाझे याची चौकशी करत आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्याने गेले काही महिने अज्ञातवासात गेलेले परमबीर सिंग हे मुंबईत दाखल झाले. आयोगाने त्यांनाही सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.

आयोगाच्या सुनावणी साठी परमबीर सकाळी लवकर पोहोचले. त्यामुळे काही वेळ त्यांनी कार्यालयात बसून घालवला. त्यानंतर ते आयोगासमोर हजर झाले. यावेळी वाझेसुद्धा आयोगासमोर हजर झाला होता. याच दरम्यान दोघांनाही निवांत वेळ मिळाला.

आयोगाच्या बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये या दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी सुरक्षारक्षक किंवा अन्य कोणीही या खोलीत नव्हते.

परमबीर आणि वाझेच्या भेटीबाबत समजताच एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी या भेटीला आक्षेप घेतला आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका उच्च पदस्थ अधिकार्‍याने तत्काळ या भेटीच्या ठिकाणी धाव घेत, घडलेला घटनाक्रम जाणून घेऊन उपस्थित पोलिसांसह अन्य व्यक्तींकडे चौकशी केली. त्यानंतर एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याच्या अधिपत्याखाली या भेटीच्या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

* चांदिवाल आयोगासमोर हजर होऊन आपल्या विरोधातील जामीनपात्र वॉरंट रद्द करुन घेतल्यानंतर परमबीर सिंग यांनी सीआयडीसमोर हजेरी लावली. सीआयडीने भाईदर मधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी वसुलीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी परमबीर यांना सोमवारी हजर रहाण्यास सांगितले होते. त्यानुसार सीआयडीने परमबीर सिंग यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती मिळते. तर, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आले आहे.

Back to top button