किरीट सोमय्या म्हणाले, आव्हाड यांच्याकडेही दुसरा वाझे | पुढारी

किरीट सोमय्या म्हणाले, आव्हाड यांच्याकडेही दुसरा वाझे

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडेही दुसरा सचिन वाझे आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. एसआरए आणि म्हाडामध्ये त्यांच्या माध्यमातून वसुली सुरू आहे. 31 डिसेंबरपर्यंत 27 घोटाळ्यांचा तपास होऊन कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे फोन टॅप करा, अन्य काही करा, मला काहीही फरक पडत नाही. पण, या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील अलिबाबा आणि चाळीस चोरांचे 40 घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे पैसे लुटणार्‍यांना डाकूच म्हणतात, असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख कुठे लपलेत?

वादग्रस्त क्लिप व्हायरल प्रकरणी सोमय्या म्हणाले की, क्लिप कोणाकडून व्हायरल झाली हे विचारणार असाल तर मग राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांची माहिती कुणी दिली? हे देखील विचारणार का? आपले फोन ठाकरे सरकार टॅप करीत असल्याचे या व्हायरल क्लिपमुळे सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.

मला माहिती कोणी दिली यापेक्षा घोटाळे महत्त्वाचे आहेत, असे सोमय्या म्हणाले. अनिल देशमुख कुठे लपलेत, मातोश्री की वर्षा बंगल्यावर, असा सवालही त्यांनी केला. संशयितांना लपविण्याचे काम पोलीसच करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जेलमध्ये जावे लागणार

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशीही आपण प्रार्थना करतोय. चौकशीअंती या सर्वांचे घोटाळे सिद्ध झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये जावे लागणार, असेही ते म्हणाले.

ठाकरे-पवारांचे अभय

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे काम करत आहेत. ते घोटाळेबाज मंडळींना मोकळे सोडत आहेत. घोटाळे बाहेर काढणार्‍यांना डांबून ठेवत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Back to top button