

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : पातोंड येथे वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये वन विभागाच्या दोन अधिकार्यांसह ११ जण जखमी झाले. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी वनविभागाने हवेत गाेळीबार केला. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. (Hingoli)
वन विभागाच्या पातोंडा शिवारात असलेल्या 33 एकर जागेवर नऊ जणांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणधारकांनी या जमिनीवर पिकांची पेरणीही केली होती. या जागेवर झोपड्यादेखील बांधल्या होत्या. मात्र अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी या नऊ जणांना एक महिन्यापूर्वी नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणधारकांनी काढलेच नाही. शिवाय त्या ठिकाणी पुन्हा पेरणीच्या हालचाली सुरु केल्या होत्या.
वन विभागाने नोटीस देऊन आज अतिक्रमण हटविण्याबाबत कळविले होते. तरीही मात्र त्यांनी अतिक्रमण काढलेच नाही. त्यानंतर आज सकाळी वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, विनोद जांभुळे यांच्यासह 30 जणांचा ताफा जेसीबी मशीनसह पातोंडा शिवारात अतिक्रमण काढण्यासाठी गेला. वन विभागाचे पथक येत असल्याचे लक्षात येताच अतिक्रमणधारकांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीत वनपरिक्षेत्र अधिकारी टाक, जांभूळे, कर्मचारी ए. आर. अहिनाले, एस. एस. सावंत, के. बी. आयनले, प्रकाश केंधळे, पी. ए. लष्करे यांच्यासह ११ जण जखमी झाले.
यावेळी वन विभागाने प्रत्युत्तरात केलेल्या लाठीचार्जमध्ये दोन गावकरी जखमी झाले. जखमींना सिरसम येथील प्राथमिक आरोग्य केद्र व हिंगोलीच्या शासकी रुग्णालयात दाखल केले हे. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या अधिकार्यांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार नाना पोले, मगन पवार यांच्यासह दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली आहे. (Hingoli)
हेही वाचलं का?