Rishabh Pant : फलंदाजीत फेल गेलेल्या ऋषभ पंतचे द. आफ्रिकेत ‘स्पेशल शतक’ | पुढारी

Rishabh Pant : फलंदाजीत फेल गेलेल्या ऋषभ पंतचे द. आफ्रिकेत ‘स्पेशल शतक’

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) बॅटमधून धावा निघताना दिसत नाही. पण विकेटच्या मागे हा खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहे. काही दिवसांपूर्वीच पंत भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून सर्वात वेगवान १०० बळी घेणारा खेळाडू ठरला होता. आता या यष्टीरक्षक फलंदाजाने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या डावातील शेवटचा झेल घेताच पंतने (Rishabh Pant) आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० झेल पूर्ण केले. विकेटच्या मागे अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा भारतीय यष्टीरक्षक ठरला. पंतच्या आधी सय्यद किरमाणी, किरण मोरे, महेंद्रसिंग धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे.

झेल घेण्यात धोनी मागे राहिला..

ऋषभ पंतने (Rishabh Pant) २७ सामन्यात १०० झेल घेतले आहेत. हा एक भारतीय विक्रम आहे. महेंद्रसिंग धोनीला १०० झेल घेण्यासाठी ४० कसोटी खेळावे लागले. धोनीने कसोटी कारकिर्दीत २५६ झेल घेतले आहेत. त्याचबरोबर माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांच्या नावावर १६० तर किरण मोरे यांच्या नावावर ११० झेल आहेत. पंतने आपल्या २७ व्या कसोटी सामन्यात झेलचे शतक झळकावले आहे. जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, कसोटीत १०० झेल घेणारा पंत हा ४२ वा यष्टिरक्षक ठरला.

सर्वात जलद १०० बळी घेणारा भारतीय यष्टीरक्षक.. (Rishabh Pant)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऋषभ पंत भारतासाठी सर्वात जलद १०० बळी घेणारा यष्टिरक्षक ठरला. पंतने आपल्या २६ व्या कसोटीत ही कामगिरी केली. त्याच्या आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३६ कसोटी सामन्यात १०० बळी घेतले होते. पंतने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी हा विक्रम केला.

धोनीनंतर ऋद्धिमान साहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने हा पराक्रम ३७ कसोटीत केला. त्याचवेळी किरण मोरे चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी ३९ कसोटीत ही कामगिरी केली. नयन मोंगिया पाचव्या तर सय्यद किरमाणी सहाव्या स्थानावर आहेत. मोंगियाने १०० बळींसाठी ४१ कसोटी खेळाव्या लागल्या. त्याचवेळी किरमाणी यांनी ४२ कसोटींमध्ये ही कामगिरी केली.

Back to top button