१५ विद्यार्थी, २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, विन्हेरे मधील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश! | पुढारी

१५ विद्यार्थी, २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, विन्हेरे मधील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश!

विन्हेरे; विराज पाटील : मंगळवारी सायंकाळी उशिरा विन्हेरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आढळून आलेल्या पंधरा विद्यार्थी व दोन शिक्षकांच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. या घटनेनंतर विभागातील आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन सर्व संबंधित गावांतून तातडीने आशा सेविकांमार्फत नागरिक नातेवाईकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती विन्हेरे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. केंद्रात आरटीपीसीआर व अँटीजेन क्यूब्सचा मुबलक साठा असल्याची माहिती दिली आहे.

या संदर्भात केलेल्या चौकशी दरम्यान संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधे सुमारे २१० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले असून दहा शिक्षक विद्यार्थी वर्गास विद्यादानाचे काम करीत आहेत.

या पंधरा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आले. यावेळी पॉझिटिव्ह आढळून आल्याने तातडीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये उर्वरित पंधरा विद्यार्थी व दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तरीही या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

न्यू इंग्लिश स्कूलची शाळेच्या इमारतीमध्ये सॅनिटायझर करून घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.  संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा तसेच शासनाने दिलेल्या निर्देशाचे व मास्कचा वापर करावा असे सूचित केले आहे.

दरम्यान रायगड जिल्हा व राज्यात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांसह खासगी शाळा बंद करण्याची शक्यता असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. या संदर्भात येत्या चोवीस तासात शासनामार्फत निर्देश येतील असे सांगण्यात आले आहे .

हेही वाचलत का? 

Back to top button