

राजस्थानमधून तब्बल 15 कोटींचे हेरॉईन ( Heroin ) ड्रग्ज घेऊन मुंबईत आलेल्या दोन ड्रग्ज तस्करांना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने डोंगरीतून बेड्या ठोकल्या आहेत. हकीम गुल खान (वय 56) आणि जीवनलाल भेरूलाल मिणा (21) अशी या आरोपींची नावे आहेत.
राजस्थानमधील अफूचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन प्रतापगड आणि चित्तोडगड जिल्ह्यातून रेल्वे व बसमार्गे मुंबईत आणले जात असल्याची माहिती आझाद मैदान युनिटला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकाने ड्रग्ज तस्करांचा माग काढण्यास सुरुवात केली. यात राजस्थानमधील ड्रग्ज पुरवठादारांची नावे एनसीबीला मिळाली. आझाद मैदान युनिटने खान आणि मिणा यांची माहिती काढली असता ते बसने मुंबईत ड्रग्ज घेऊन आले आहेत. हे दोघे डोंगरीमधील एका लॉजवर थांबले असल्याची माहिती मिळताच आझाद मैदान युनिटने येथे छापेमारी करुन दोघांनाही ताब्यात घेतले.
आझाद मैदान युनिटने खान याच्याकडून 4 किलो 500 ग्रॅम आणि मिणा याच्याकडून 500 ग्रॅम हेरॉईन ( Heroin ) जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे ड्रग्ज ज्या व्यक्तीला देणार होते, त्यांची नावे आरोपींनी सांगितली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी यावर्षी 86 कोटी 50 लाखांचे 03 हजार 813 किलो ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी 88 गुन्हे दाखल करुन 129 आरोपींना अटक करत 60 कोटी 16 लाखांचे 02 हजार 569 किलो ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. तर, मुंबईतील पोलीस ठाण्याच्या स्तरावर 03 हजार 245 गुन्हे दाखल करुन 03 हजार 446 आरोपींना अटक करून 26 कोटी 34 लाखांचे 01 हजार 243 किलो ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे.