

चंदिगड; पुढारी वृत्तसेवा : बलात्कार आणि हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Chief Gurmeet Ram Rahim) पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या पॅरोलविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. सुनावणीदरम्यान, यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रतिसवाल केला की, एखाद्या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका जनहित याचिका कशी काय होऊ असे विचारले. या याचिकेत म्हटले गेले होते की, सध्या पंजाबमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डेरा प्रमुखाचा पंजाबवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत डेरा प्रमुखाला पॅरोल मंजूर करण्यापूर्वी पंजाब सरकारकडून अभिप्राय घ्यायला हवा होता.
याचिकाकर्त्याने डेरा प्रमुखाला पॅरोल देण्याविरोधात हरियाणा राज्याकडे सादर केलेल्या निवेदनावर निर्णय घेण्यास उच्च न्यायालायने हरियाणा सरकारला सांगितले आहे. त्यावर राज्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दिले की, याचिकाकर्त्याच्या निवेदनावर आठवडाभरात निर्णय घेतला जाईल.
गुरमीत बाबा राम रहीमच्या पॅरोलविरोधात चंदीगडचे वरिष्ठ वकील एच.सी. अरोडा यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पॅरोलचा फायदा घेऊन तथाकथित बाबा पुन्हा आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असल्याचा आरोप एच.सी. अरोडा यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो सत्संग करत आहे. डेरा प्रमुख गाण्यांचे शूटिंगही करत आहे. त्याचे कृत्य पॅरोलच्या नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. (Dera Chief Gurmeet Ram Rahim)
रोहतकचा सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगतोय बाबा राम रहीम
गुरमीत राम रहीम बलात्कार आणि हत्येप्रकरणी २०१७ पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. डेरा प्रमुख यापूर्वी अनेकदा पॅरोलवर बाहेर आला आहे. या वर्षी जूनमध्ये त्याला पॅरोल मंजूर झाला होता. गुरमीत राम रहीम सध्या 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे, त्याला विशेष सीबीआय न्यायालयाने 2017 मध्ये शिक्षा सुनावली होती.
अधिक वाचा :