

वास्को, पुढारी वृत्तसेवा : बोगदा येथील घटनेसंबंधी काँग्रेस आमदारांनी पोलिसांवर दबाब घालू नये. पोलिसांना त्यांच्या पध्दतीने तपास करू द्यावा, असे आवाहन दक्षिण गोवा भाजपा अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी सोमवारी सायंकाळी येथे केले. यापूर्वी अशा घटना कधी घडल्या नव्हत्या. काँग्रेसवाल्यांना पश्चिम बंगालसारखी परिस्थिती येथे करावयाची आहे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, मुरगाव भाजप मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक दयानंद नाईक, नगरसेवक दामोदर नाईक, नगरसेवक रामचंद्र कामत, नगरसेवक लिओ रॉड्रिग्ज, नगरसेवक प्रजल मयेकर, नगरसेविका मंजुषा पिळर्णकर, राज्य कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, महिला मंडळ अध्यक्ष छाया होन्नावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर उपस्थित होते.
आमदार दिगंबर कामत यांना मोती डोंगरावर जे चालते ते वास्कोत व्हावे असे वाटते काय, असा प्रश्न तुळशीदास नाईक यांनी यावेळी केला. मुरगाव मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते आपले कारनामे दाखवू लागले आहेत. पोलिस उपस्थित असताना नगरसेवक मयेकर यांच्या घरावर दगडफेक केली.
काँग्रेस आमदार हे पोलिसांवर दबाब टाकण्यासाठी आले होते, असा दावा त्यांनी केला. जर सदर प्रकरण कुटुंबांतील वाद आहे, तर काँग्रेस कार्यकर्ते दगडफेक करण्यासाठी का आले होते, या घटनेपूर्वी एक तास अगोदर आमदार संकल्प आमोणकर तेथे आले होते. त्यामुळे त्यांची या प्रकरणाला फूस असावी, असे प्रजल मयेकर म्हणाले. योगेश बांदेकर यांनी आपणास मारहाण कशी करण्यात आली, यासंबंधी माहिती दिली.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie