पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील उर्वरित तीन मंत्र्यांनी शनिवारी दुपारी मंत्रिपदाची राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथ घेतली. मगोपचे सुदिन ढवळीकर, भाजपचे निळकंठ हळर्णकर व सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिपदाची मराठी भाषेतून शपथ घेतली.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांचा शपथविधी २८ मार्चला झाला होता. त्यानंतर उर्वरित तीन मंत्री कोण? याविषयी विविध नावे पुढे येत होते. अखेर गोवा भाजपच्या राज्य सुकाणू समिती आणि केंद्रीय नेत्यांच्या चर्चेनंतर वरील तीन नावे मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, तिन्ही मंत्र्यांना खातेवाटप येत्या आठवड्यात होईल, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपसभापती म्हणून सुभाष फळदेसाई यांची निवड झाली होती. सांगे तालुक्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांचा फळदेसाई यांना मंत्रिपद द्यावे म्हणून मागणी होत होती. ती मागणी आज पूर्ण झाली. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद दिल्याने फोंड्यात चार मंत्री झाले आहेत. बार्देश तालुक्यात उत्तर भागात आणखी एक मंत्रिपद देऊन भाजपने समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच निळकंठ पुन्हा मंत्री झाले आहेत.
दरम्यान, मगोपचे सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवली आहे, हे स्पष्ट आहे. सुदिन यांना मंत्रिपद देण्यालाच नव्हेतर त्यांचा पाठिंबा घेण्यात आमदारांचा विरोध पक्षनेतृत्वाने नजरेआड केला आहे.
हेही वाचलंत का?