कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या निवासस्थानावर एस. टी. कर्मचार्यांनी हल्ला केला. या विषयी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर 'मी काय बोलणार' असा प्रतिसवाल करत खासदार उदयनराजे यांनी कर्म या जन्मीच करायचे अन् ते याच जन्मी फेडायचे असते. हे तुम्हाला, मला आणि सगळ्यांनाच लागू होते, अशा शब्दांत उत्तर दिले.
तुम्हाला काय अपेक्षित आहे, अजून दगड मारायला हवे होते, असा सवाल करून ते म्हणाले की, या छोट्या गोष्टी आहेत; पण तुम्ही कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवा.
काँग्रेस, राष्ट्रवादीने घराणेशाही पुढे करून सत्ता मिळविली; मात्र त्यांना आता अहंकार आला आहे. केवळ सत्तेसाठीच ते एकत्र आले असून महाराष्ट्र अस्थिर आहे. वेगळी उद्दिष्ट्ये असणारे लोक आणि पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतात; मात्र त्यांची दिशा, वाटाही वेगळ्याच असतात, असे सांगून ते म्हणाले की, राजेशाहीचे रूपांतर लोकशाहीत करण्याचा विचार छत्रपती शिवरायांनी दिला.
मात्र, आता तुम्ही लोकशाहीतील राजे राजकारणासाठी घराणेशाही आणत आहात, ते घातक आहे हे लक्षात ठेवा. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेतही घराणेशाही आल्याचे सांगून ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेस, राष्ट्रवादीला भरभरून मतदान केले. त्यानंतर बस्स आम्ही आणि आम्हीच असे म्हणत त्यांनाही अहंकार आला. त्यांनाही आमच्या शिवाय दुसरे कोणीच नाही, असे वाटायला लागले आहे.
आता मूठभर लोकांच्या हातात सत्ता एकवटली असून बाकी सर्वांना सोयीप्रमाणे वाकविले जात आहे. भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे राज्याची धुरा सांभाळली. त्यावेळी शिवसेना बरोबर होती, मग काय घडले की, त्यांनी चिरफाड करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वजण सत्ता ठिकवण्यासाठीच एकत्र आहेत. मग, प्रगतीचा विचार त्यांच्या डोक्यात येणारच कसा, त्याचा विचार मतदारांनी करावा, असे ते म्हणाले.
खासदार उदयनराजे : शिवसेनेनेही विचार करावा
शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना स्थापन झाली. त्यांनी भाजपपासून फारकत घेताना विचार करायला हवा होता. लोकांना आकर्षितकरण्यासाठी शिवरायांचा आधार घेता. मग, त्यांचे विचार का आचरणात आणत नाहीत, असा सवाल खा. उदयनराजे यांनी केला.