

Goa Film Festival
पणजी : २०२५ चा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यंदा इतर आवृत्तींपेक्षा थोडा हटके आणि आकर्षक बनवण्यासाठी अनेक नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची मांदियाळी असून यावर्षीचे उद्घाटन पहिल्यांदाच चित्ररथाच्या माध्यमातून होणार आहे.
जुन्या सचिवालयापासून कला अकादमीपर्यंत गोव्यातील १२ चित्ररथ आणि इतर व्यावसायिक ११ चित्ररथांची परेड होईल. यंदा आमिर खान, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, ऋषभ शेट्टी, साई पल्लवी, रमेश सिप्पी, किरण सिप्पी, विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर, बॉबी देओल, खुशबू सुंदर आणि सुहासिनी मणिरत्नम यांच्यासोबतच अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी २१ मास्टरक्लासेस आणि पॅनेल चर्चेच्या माध्यमातून ते उपस्थित प्रतिनिधी आणि सिनेरसिकांशी संवाद साधतील.
इफ्फीमध्ये ५० महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. याशिवाय पहिल्यांदाच एआय चित्रपट महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा इफ्फी अनोखा ठरणार, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
इफ्फी २०२५ मध्ये आयनॉक्स पणजी, मॅक्विनेझ पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, झेड-स्क्वेअर सम्राट अशोक आणि रवींद्र भवन, मडगाव येथे पाच प्रमुख ठिकाणी चित्रपट दाखवले जातील. तर मिरामार बीच, फातोर्डा येथील रवींद्र भवन आणि हणजूण बीच येथे खुल्या पद्धतीने चित्रपट दाखवले जातील.
इफ्फी २०२५ साठी जपान हा कंट्री फोकस देश आहे. जपानने आपल्या चित्रपटांना आजच्या काळात वेगळ्या उंचीवर नेले आहे. देशाच्या विकसित होत असलेल्या चित्रपट भाषेला आकार देऊन उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या आणि लेखकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे. यंदा काळजीपूर्वक निवडलेल्या सहा शीर्षकांमध्ये - स्मृती आणि ओळखीच्या अंतरंग संकल्पनांपासून ते चित्रपट महोत्सव-विजेत्या मानसशास्त्रीय थ्रिलर, समलैंगिक कथा, युवा विज्ञान कथा, काव्यात्मक आणि नॉन-लिनियर प्रयोगाचा समावेश आहे.
८१ देशांमधून एकूण २४० हून अधिक चित्रपट.
आंतरराष्ट्रीय विभागात १६० चित्रपट, ज्यात १३ जागतिक प्रीमियरचा समावेश.
८० हून अधिक पुरस्कार विजेते चित्रपट. २१ अधिकृत ऑस्कर-नामांकन मिळालेले चित्रपट प्रदर्शित होतील.
' सिनेमा ऑफ द वर्ल्ड' अंतर्गत ५५ हून अधिक चित्रपट आणि महोत्सवात सहभागी झालेल्या १३३ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश.
इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल या दोन्ही दिग्गजांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या प्रतिष्ठित कार्याची, व्यापक लोकप्रियतेची आणि दशकांपासून भारतीय चित्रपट सृष्टीला आकार देण्यातील योगदानाची दखल घेऊनच त्यांचा हा गौरव होत असल्याचे, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन म्हणाले.