

पणजी : पिनाक कल्लोळी : आर्थिक दुर्बल वर्गाला स्वावलंबी होण्यासाठी बचत गटासारखा चांगला मार्ग नाही. याची जाणीव ठेवूनच तीन वर्षांपूर्वी डिचोली कचरा प्रकल्पातील कचरा कामगारांनी एकत्र येऊन बचत गटांची स्थापना केली. आज या गटांमार्फत सदस्यांना कर्ज तर पुरविले जाते. पण, त्याशिवाय एका अभिनव करारानुसार, कचरा विकून मिळणार्या नफ्यातील अर्धा हिस्सा बचत गटांकडे सुपूर्द केला जातो. एका अर्थाने बचत गटाकडे स्वामित्वाचा अधिकार दिलेला आहे.
गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचा डिचोली येथील हा कचरा प्रकल्प नगरपालिका, संपूर्ण अर्थ आणि मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवातर्फे हाताळला जातो. संपूर्ण अर्थ आणि मिनरल फौंडेशनने कचरा वेचणार्या कामगारांच्या बचत गटासोबत करार करून त्यांना सहकार तत्त्वावर कंपनीमध्ये भागीदार बनवले आहे. प्रथम कामगारांनी वर्गीकृत केलेला कचरा बचत गटामार्फत संपूर्ण अर्थला विकला जातो. यानंतर संपूर्ण अर्थ हा कचरा देशभर अन्यत्र विकते. यातून मिळालेल्या नफ्याचा पन्नास टक्के भाग थेट बचत गटाच्या बँक खात्यावर जमा केला जातो.
सध्या येथे 'जय ब्राह्मणेश्वरी' आणि 'जय संतोषी माँ' हे दोन बचत गट कार्यरत आहेत. दोन्ही बचत गटात एकूण 27 सदस्य असून, त्यात 17 महिला सदस्य आहेत. दर महिन्याच्या दहा तारखेला दोन्ही बचत गटांची बैठक बोलावली जाते. बैठकीत कंपनीकडून बाहेर विकला जाणार्या कचर्याच्या मूल्यांकनास मान्यता देणे, प्राप्त नफा कामगारांमध्ये कसा वाटायचा याचा निर्णय सदस्यांकडून सर्वानुमते घेतला जातो. याशिवाय सदस्यांना खासगी वा अन्य कारणांसाठी सूक्ष कर्ज हवे असल्यास याबाबतही निर्णय घेण्यात येतो.
बचत गटाकडून मिळालेल्या सूक्ष कर्जामुळे अनेक कामगारांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या आहेत. माधवी चालवादी यांनी आपल्या मुलीचे परिचारिकेचे शिक्षण अशा कर्जातूनच पूर्ण केले. रामा गवळी याने बचत गटाकडून कर्ज घेऊनच आपल्या भावाचे लग्न पार पाडले. याबाबत येथील कामगार रेश्मा थाटे यांनी सांगितले की, कंपनीकडून देण्यात येणार्या नफ्यामुळे घर खर्चाला हातभार लागला आहे. पैसे जमा करून मी दुचाकी विकत घेतली, तसेच मुलांना चांगल्या शाळेतही घातले आहे. बचत गटाकडून केवळ दोन टक्के व्याजाने कर्ज मिळते, याचाही मला फायदा झाला आहे.
संपूर्ण अर्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबार्थो बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला कामगारांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करायचे आहे. कामगारांना देण्यात येणार्या नफ्यातील हिस्स्यामुळे त्यांची कामाप्रती निष्ठा वाढते. याशिवाय आपण केवळ नोकर नसून मालकही आहोत ही भावना त्यांच्यामध्ये येते. यामुळे ते अधिक जबाबदारीने काम करतात. याचा चांगला परिणाम होऊन कचरा प्रकल्पही योग्य पद्धतीने चालू राहतो.
मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवाचे प्रकल्प संचालक शिवदास देसाई म्हणाल्या की, कचरा कामगारांमध्ये आर्थिक स्वावलंबन यावे यासाठी आम्ही बचत गटाला नफ्याचा हिस्सा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पैशाच्या बाबतीतील सर्व निर्णय बचत गटामार्फत चर्चा करूनच घेतले जातात. यामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. याशिवाय आम्ही त्यांना अन्य सरकारी मदत मिळवून देण्यासही सर्वोतोपरी मदत करत आहोत.
हेही वाचलंत का?