गोवा : भाजप, काँग्रेसचा बहुमताचा दावा कायम | पुढारी

गोवा : भाजप, काँग्रेसचा बहुमताचा दावा कायम

पणजी : पुढारी वृत्तसेवा ; येत्या 10 मार्च रोजी राज्यात आपलेच सरकार येणार, यावर भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष ठाम आहेत. मध्यंतरी या दोन्ही पक्षांकडून अपक्ष व इतरांशी संपर्क वाढवल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. मात्र, या दोन्ही पक्षांकडून सोमवारी स्पष्ट बहुमताचा दावा केला. आम्हीच सरकार स्थापन करू, अशी भाषा दोन्हीही पक्षांनी वापरली.

कोणाशीही चर्चा नाही : भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते म्हणाले, भाजप या निवडणुकीत 22 पेक्षा जास्त जिंकणार. भाजपला बहुमताला जागा कमी पडतील. त्यामुळे बंडखोरांशी आतापासूनच चर्चा सुरू केल्याच्या वृत्तांत काहीच तथ्य नाही. भाजपने मतदानानंतर मतदानाचे विश्‍लेषण केले आहे. भाजपची मदार ही विरोधकांच्या मतविभागणीवरही नाही. मतदानाचा वाढलेला टक्का विरोधात जाणार असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

भाजपने कोविड काळात लोकांसोबत काम केले होते. भाजपचे कार्यकर्ते सातत्याने जनतेच्या संपर्कात आहेत. केवळ निवडणुका आल्यावर लोकांची आठवण काढणारा भाजप पक्ष नव्हे. त्यामुळे भाजपने राज्याला दिलेले स्थीर सरकार आणि स्थीर सरकारच्या माध्यमातून झालेला विकास यामुळेच मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलेले आहे.

यावेळी काँग्रेस एकसंध : दिगंबर कामत

काँग्रेस राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, याखेपेला काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत. उमेदवारी देतानाच ती काळजी घेण्यात आली आहे. 2017 मध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती मात्र याखेपेला काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी जराही वेळ लावणार नाही. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड आघाडी 26 जागा जिंकणार आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे.

जनता भाजप सरकारला वैतागली आहे. महागाई, बेरोजगारी, कल्याणकारी योजना ठप्प अशा अनेक समस्यांना लोक सध्या तोंड देत आहेत. सरकारविरोधात बोलण्यास न धजावणार्‍यांनीही या खेपेला मतदान यंत्रातून सरकारविरोधातील राग व्यक्त केला आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर केलेले मतदान हे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात म्हणजे सरकार विरोधात मतदान आहे.

कुंपणावरचे आश्‍चर्यचकीत

या दोन्ही मोठ्या पक्षांनी सोमवारी हे दावे केल्यामुळे काँग्रेस आणि भाजपसोबत जाऊन सत्तेची उब मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अपक्ष, इतर पक्ष यांची मदत सरकार स्थापनेसाठी लागण्याची शक्यता या दोन्ही पक्षांनी फेटाळल्यामुळे विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही या चर्चेलाही तूर्त तरी स्वल्पविराम मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button