

पणजी : पुढारी वृत्तसेवा
खा, प्या, मजा करा, मनात येईल तसे वागू, गोव्यात काहीही चालते ही मानसिकता पर्यटकांनी आता बदलावी. आता गोव्यात नियमानुसार पर्यटकांना वागावेच लागेल. चांगल्या पर्यटकांची आम्ही अपेक्षा करत आहोत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी शून्य प्रहाराला केले.
आमदार संकल्प आमोणकर यांनी अनेक किनाऱ्यांवर विदेशी महिला पर्यटकांसोबत काही देशी पर्यटक लगट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्रास देतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मंत्री खंवटे यांनी पर्यटन खात्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, किनाऱ्यांवर महिला पोलिस तैनात केले जातील.
त्याचबरोबर कोणी विदेशी पर्यटकांना त्रास देत असल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शून्य प्रहराला आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी मेरशी राष्ट्रीय मार्गाजवळ कचरा टाकण्याचे प्रकार होत आहेत.
दोन्ही पंचायती आपल्या भागात ती जागा येत नसल्याचे सांगून एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहोत. त्यामुळे पंचायतीची सीमा रेखांकन करावे, अशी मागणी केली. आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यावरण परवाने न घेता मोठे प्रकल्प पुढे नेले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
आमदार नीलेश काब्राल यांनी आयटीआय जवळ गॅस गोदाम स्थापन होण्यावर आक्षेप नोंदविला, तर आमदार दाजी साळकर यांनी वरुणापुरी जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्यामुळे तेथे सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी सदर ठिकाणाची पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन साळकर यांना दिले.
आमदार विरेश बोरकर यांनी एका कॅसोनोद्वारे लोकांची बिले दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्यांची विले रखडली आहेत त्यांना तक्रार करण्यास सांगा कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सायलन्सर आवाजावर कारवाई करा : डॉ. शेट्ये
डिचोलीमध्ये सायलेन्सर बदलून मोठ्या प्रमाणात आवाज करत दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केली. त्यावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, यापूर्वी दोनवेळा मोहीम राबवून अशा दुचार्कीवर कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा अशा दुचाकींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.