पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी महापालिकेसाठी बुधवार, दि. ११ रोजी मतदान होत असून, सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी ३४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या प्रभागांसाठी ६९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. ३० २३ प्रभागांत दुरंगी, तर अन्य सहा प्रभागांत तिरंगी लढती होणार आहेत. प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवार लढणार आहेत. मतमोजणी दि. १३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे सुरू होईल.
महापालिका निवडणुकीत १५ हजार २२५ पुरुष, तर १७ हजार २७१ महिला अशा एकूण ३२ हजार ४९६ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक १,६१७, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वात कमी ८२८ मतदार आहेत. २३ प्रभागांत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या 'प्रोग्रेसिव्ह पणजी' आणि उत्पल पर्रीकर यांच्या 'आम्ही पणजीकर' यांच्या पॅनेलमध्ये दुरंगी लढत होणार आहे.
दोन्ही पॅनेलनी सर्व ३० ही प्रभागांतून उमेदवार उभे केले आहेत. आम्ही पणजीकर पॅनलने जाहीरनामा प्रसिद्ध केला असला, तरी प्रोग्रेसिव्ह फ्रंटने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. आम्ही पणजीकर यांच्या जाहीरनाम्यात कॅसिनो संबंधित समस्या, पार्किंग प्लाझा बांधणे व शहरातील अन्य समस्यांवर भर देण्यात आला. पे पार्किंग रद्द करण्याचे आश्वासनही दिले आहे, तर प्रोग्रेसिव्ह फ्रंट पॅनलतर्फे मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर भर देण्यात आला.
आम्ही पणजीकर पॅनलला आम आदमी पक्ष, काँग्रेस यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या पॅनलच्या उमेदवारांसाठी घरोघरी प्रचारातही भाग घेतला होता. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह फ्रंटपणजी पॅनलची सत्ता गेली अनेक वर्षे महापालिकेत आहे.
त्याला उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर पॅनलने जबरदस्त टक्कर दिली आहे. त्यामुळे मोन्सेरात मनपावरील आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतात, की मतदार आम्ही पणजीकर पॅनलला साथ देतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या भाजपमध्ये असलेले मंत्री बाबूश मोन्सेरात आणि भाजपची विचारसरणी असलेले व अन्य पक्षांनी पाठिंबा दिलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र असलेले उत्पल पर्रीकर यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. पर्रीकर यांच्या पॅनलमध्ये मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपचे नगरसेवक राहिलेले अनेक उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांच्या भूमिकेवरच पणजीची सत्ता अवलंबून आहे.
नेत्यांचे भवितव्य ठरविणारी निवडणूक...
महापालिका निवडणूक पणजीचे भवितव्य ठरवणारी आहे. महापालिकेत ज्याच्या पॅनलची सत्ता येईल, त्याला पणजीतील भाजपची उमेदवारी २०२७मध्ये मिळू शकते, अशी चर्चा आहे. कारण २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाबूश मोन्सेरात यांना भाजपची उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी भरून उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात यांना जोरदार टक्कर दिली होती. मोन्सेरात अवघ्या दीड हजार मतांनी निवडून आले होते. त्यामुळे महापालिका उत्पल पर्रीकर यांच्या 'आम्ही पणजीकर पॅनल'ने जिंकली तर बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.