

पणजी; दीपक जाधव : होंडा औद्योगिक वसाहतीतील 'पुनिस्का इंजेक्टेबल' प्रा. लि. या फार्मास्युटीकल केमिकल कंपनीच्या गोदामाला बुधवारी (दि.२९) मध्यरात्री २ वाजता आग लागली. वाळपई आणि डिचोली अग्निशमन दलाच्या तब्बल ८ बंबांनी सलग ६ तास अथक प्रयत्न करून आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. यात कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
होंडा औद्योगिक वसाहतीतील सलाईन आणि इतर वैद्यकीय साहित्याचे उत्पादन करणाऱ्या 'पुनिस्का इंजेक्टेबल प्रा. लि.' कंपनीचे गोदाम आहे. गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तिव्रता लक्षात घेत त्यांनी डिचोली अग्निशमन दलाचेही बंब मागवले. या गोदामात मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्यांनी भरलेले बॉक्स होते. ते बाहेर काढण्यासाठी एका जेसीबीचा वापर करण्यात आला. तसेच आठ अग्निशामक बंब वापरावे लागले. पाणी आणि फेसाळ पाण्याचा वापर करून साधारण सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही आग नियंत्रणात आली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाळपई अग्निशमन दलाचे स्टेशन फायर संतोष गावस यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकारी श्रीकांत गावकर, तुळशीदास झर्मेकर, सतीश नाईक, रुपेश गावकर, संदीप गावकर यांच्यासह डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी नाईक, जवान संदीप परब, अमोल चोर्लेकर व योगेश माईणकर आदी जवानांच्या पथकाने ही आग विझवण्यासाठी खडतर परिश्रम घेतले.
हेही वाचा :