मडगाव : पुढारी वृत्तसेवा ; सावर्डेचे भाजप उमेदवार गणेश गावकर यांचा सुमारे ५००० च्या मताधिक्यांने विजय झाला आहे. त्यानी भाजपचे बंडखोर नेते दीपक प्रभू पावसकर यांचा पराभव केला. 'सरकार सत्तेत येताच सहा महिन्यात राज्यातील खाणी सुरू केल्या जातील' असे आश्वासन गणेश गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
गणेश गावकर हे २०१२ साली भाजपच्या उमेदवारीवर सावर्डे मतदारसंघातून जिंकून आले होते. पण २०१७ मध्ये त्यांचा पराभव झाला. मगोपमधून निवडून आलेले दीपक पावसकर यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आले होते. बांधकाम खात्यात नोकर भरतीच्या कथित घोटाळ्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर भाजपने त्यांना डावलून गावकर यांना उमेदवारी दिली होती. यामुळे पावसकर यांच्यावर अपक्ष निवडणूक लढविण्याची वेळ आली होती.
अत्यंत अटीतटीच्या लढतीत गणेश गावकर यांनी बाजी मारत सावर्डे मतदारसंघात विजय संपादन केले आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निवडणूक जिंकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सावर्डे मतदारसंघात एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही अशी परंपरा असली तरी, आपण त्या परंपरेला तडा दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भाजप सरकार स्थापन करणार आहे. तर सत्तेत येताच खाणी सुरू करण्यासह बेरोजगारी मिटविण्याचे काम केले जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का?