

पणजी : क्रांतिराज सम्राट
घरात पारंपरिक माती कला जोपासली जात होती. मातीची भांडी, कौले, पणती, गणेश मूर्ती बनविल्या जात होत्या. त्या पाहून आवड निर्माण झाली. त्यातून या कलेबरोबरच शिल्प कला जोपासत मागील ३५ वर्षांपासून मातीमध्ये घाम गाळल्याचे चीज झाले. कधी कल्पना ही केली नव्हती की राष्ट्रीय पुरस्कार मिळेल म्हणून, अशा शब्दांत भारत सरकारच्या टेक्स्टाईल मंत्रालयाकडून हस्तकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमर लाडू शेट (मये) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या कलेची आवड कशी निर्माण झाली हे सांगताना अमर म्हणाले की, घरात पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी, कौले, पणती, गणेश मूर्ती बनविल्या जात होत्या. वडील माती काम करताना पाहून मलाही आवड निर्माण झाली. त्यामुळे मला यासाठी आवश्यक यंत्र आईने घेऊन दिले. तेव्ही पाचव्या इयत्तेत शिकत होतो. पारंपरिक कला जोपासताना शिल्पाकृती बनवत होतो. तसेच फावल्या वेळेत चित्रकला जोपासत होतो. यातूनच अधिकाधिक शिकत असताना मास्टर इन पोटरी कोर्स पूर्ण केला.
त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी करत असताना पुतळे बनविणे आणि सिमेंट-माती एकत्रित करून एखादी कलाकृती बनविण्याचा प्रयोग करत असे. त्याबरोबरच हस्तकला महामंडळ आणि सरकारकडून जेव्हा मुलांना माती कला शिकविण्याची संधी दिली जाते. तेव्हा शिकविण्यासाठी जात असतो, असे सांगून अमर म्हणाले, वर्षाकाठी ७०० ते ८०० गणेशमूर्ती बनवितो. त्याशिवाय मातीची भांडी बनवून घाऊक पद्धतीने विक्री करतो. हे काम करत असताना जेव्हा गरज भासते तेव्हा आई, भाऊ आणि बहीण यांचेही सहकार्य लाभते, असेही ते म्हणाले.
येत्या ९ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे शेट यांनी सांगितले. दरम्यान, हस्तकलेसाठी केंद्रीय टेक्सटाईल मंत्रालयाकडून देण्यात येणाऱया या पुरस्कारांची निवड १८ जुलै २०२६ रोजी करण्यात आली होती.