

पणजी : प्रभाकर धुरी
गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन कालव्यांपैकी उजव्या कालव्यातील पाणी २० ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. दोन्ही कालव्यांची तातडीने दुरुस्ती करायची असल्याने दोन्ही कालवे बंद ठेवण्याचे महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे नियोजन होते. त्यासाठी गोवा सरकारचीही संमती होती. मात्र, गोवा सरकारने अचानक निर्णय बदलून एकच कालवा बंद ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे आता उजवा कालवा बंद, तर डावा कालवा सुरू राहणार आहे.
दरम्यान, उजव्या कालव्याची खानयाळे येथील गळती काढायची असल्याने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी एक दिवस कालवा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० रोजीपासून कालवा दोन महिने १२ दिवस बंद राहणार आहे.
उजव्या कालव्याचे पाणी पेडणे तालुक्यातील चांदेल, मोप, धारगळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात येत असल्याने त्यांना या काळात पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. डाव्या कालव्याचे पाणी अस्नोडा, गिरी आणि पर्वरीला अखंड मिळणार आहे. त्यामुळे त्या भागाला पाणीटंचाई फारशी जाणवणार नाही. दुरुस्तीअभावी कालव्यांना गळती लागते. पाणी झिरपून आजुबाजूच्या शेतात आणि नदीत जाते. ती तूट लक्षात घेऊन कालव्यातून दुप्पट पाणी गोव्याला सोडले जाते.
कालव्यांची दुरुस्ती झाली तर निम्मे पाणी वाचू शकते आणि दुष्काळाच्या दिवसांत ते वापरता येऊ शकते. शिवाय सध्या गोव्यात अजूनही अनेक ठिकाणी पाणी मुबलक उपलब्ध आहे. सध्या पाणीटंचाई नाही. त्यामुळे पाणी बंद ठेवून दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीला गोवा सरकारने प्राधान्य द्यायला हवे होते. मग ऑगस्ट २०२७पर्यंत पाऊस पडला नसता, तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले नसते, असे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. दोन्ही कालवे बंद ठेवल्यास दुष्काळावर मात शक्य उजवा कालवा दोन महिने बंद ठेवल्याने आपण ३० दशलक्ष घनमीटर पाणी वाचवू शकतो.
हे पाणी १०० एमएलडीप्रमाणे आम्ही ३०० दिवस सिंधुदुर्ग आणि गोव्याला पुरवू शकतो. दोन्ही कालवे बंद ठेवले, तर आम्ही दुप्पट पाणी वाचवू व पुरवू शकतो. यातून दुष्काळावर मात करणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही कालवे बंद ठेवण्याची गरज आहे, असे मत तिळारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मांडले.