गोवा बनणार न्यू टेक्नॉलॉजी हब : सुरेश प्रभू | पुढारी

गोवा बनणार न्यू टेक्नॉलॉजी हब : सुरेश प्रभू

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : गोवा हे निसर्गसुंदर असे पर्यटकांच्या आकर्षणाचे राज्य आहे. गोव्यात वाढलेला तंत्रज्ञानाचा वापर पाहता येत्या काळात गोवा न्यू टेक्नॉलॉजी हब बनणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय रेल्वे व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये व्हायब्रंट गोवातर्फे आयोजित ग्लोबल टेक समीटच्या उद्घाटन सोहळ्यात प्रभू बोलत होते.

या समीटचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभू, व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष राजकुमार कामत, असोचॅमचे प्रमुख मांगिरीश पै रायकर, ग्लोबल टेक समीटचे अध्यक्ष मिलिंद अनवेकर, जीसीसीचे अध्यक्ष सुजीत शेट्टी, उद्योग सचिव स्वेतीका सचन आदी उपस्थित होते.

प्रभू म्हणाले, गोव्यामध्ये सुंदर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर नवीन विचार, नवीन दिशा मिळते. नवीन तंत्रज्ञानाबाबत विचार होतो. गोव्याच्या विकासासाठी हेच नवीन तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. नोकर्‍यांची संख्या कमी होत असताना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीने व्यावसायाकडे वळायला हवे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणार्‍या सवलती घेऊन युवकांनी आपले भवितव्य घडवायला हवे. या समीट मधून नवे विचार, नवे तंत्रज्ञान मिळणार आहेत. आर्टीफिशीयल इंटेलिजन्स ही एक संधी आहे. नव्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रभू म्हणाले. राजकुमार कामत यांनी प्रास्ताविक केले.

एआयमुळे स्टार्टअप क्रांती : रायकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय वापर सकारात्मक केल्याने देशात स्टार्टअप क्रांती झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याच पावलावर पाऊल ठेवून गोव्यामध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचे रायकर म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button