Lok Sabha Election 2024 : उदयनराजे भोसले-अमित शाह भेट लांबणीवर, शनिवारी भेटीची शक्यता | पुढारी

Lok Sabha Election 2024 : उदयनराजे भोसले-अमित शाह भेट लांबणीवर, शनिवारी भेटीची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दुसऱ्या यादीत राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र यात सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक चर्चांना पेव फुटले असताना खासदार उदयनराजे भोसले दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते मात्र त्यांची भेट आज होऊ शकली नाही, कदाचित उद्या शनिवारी भेट होण्याची शक्यता आहे.

‘अबकी बार, 400 पार’ हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने लोकसभेच्या एकेक जागेवर विचार करून उमेदवार दिले जात आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी किती लोकसभा मतदारसंघ भाजप महायुतीतून लढणार याची आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. मात्र भाजपने त्यापूर्वीच 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर उदयनराजे समर्थकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर उदयनराजे भोसले काल, गुरुवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

साताऱ्यातील लोकसभा उमेदवारी संदर्भात उदयनराजे भोसले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमधील ही भेट आज शुक्रवारी होणार होती मात्र आता ही भेट शनिवारी होणार असल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत धुसफूस चालली आहे का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत.

Back to top button