इफ्फी : पुनरावलोकनात ‘आंद्रे कोंचालवस्की’ | पुढारी

इफ्फी : पुनरावलोकनात ‘आंद्रे कोंचालवस्की’

डॉ.अनमोल कोठाडिया

52 व्या इफ्फीत आंद्रे कोंचालवस्की (रशिया) आणि बेला टार (हंगेरी) या महत्त्वाच्या दिग्गज दिग्दर्शकांचे पुनरावलोकनीय पॅकेजस असणार आहेत. तेव्हा आज कोंचालवस्की यांच्याविषयी थोडक्यात महत्त्वाचे.

कोणत्याही चित्रपट महोत्सवामध्ये दर्दी रसिकांसाठी पुनरावलोकनीय (रेट्रोस्पेक्टिव्ह) हे अत्यंत आकर्षणाचे पॅकेज असते. त्यात एखाद्या दिग्दर्शकाच्या, तंत्रज्ञाच्या वा अभिनेत्याच्या सर्व वा काही महत्त्वपूर्ण कलाकृती एकत्र दाखविल्या जातात. त्या पाहता पाहता त्या त्या कलावंताच्या कलादृष्टीचा आणि जीवनदृष्टीचा अभ्यास होतो. शिवाय त्याच्या कारकीर्दीचा आलेखही समजून घेता येतो. कधीकधी विषयानुसारही पुनरावलोकनीय पॅकेजेस असू शकतात. जसे मागे इफ्फीत ’युगोस्लाव्हियाची शकले झाल्यानंतर’ असे एक पॅकेज होते.

’कोणतीही कला ही खोटीच असते, मात्र महान कलाकृतीतील त्या रचित खोटेपणातून जीवनाचे सत्य समजून घेण्यास मदत होते’, अशी धारणा असलेल्या आंद्रे कोंचालवस्की यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही कलाकार असणार्‍या आई वडील आणि भावंडांचीच आहे.

पियानोवादक बनता बनता चित्रपटांकडे वळलेल्या कोंचालवस्की यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात ही तारकोवस्की या दिग्गज दिग्दर्शकासोबत ’इव्हान्स चाइल्डहूड’ (1962)च्या निमित्ताने झाली. नंतर ’आंद्रे रुब्लॉव्ह’ (1966) साठी तर सहपटकथालेखक म्हणून काम केले. दरम्यान ’द फर्स्ट टीचर’ (1965) या त्याच्या पहिल्या पूर्ण लांबीच्या कथापटाचे स्वागत झाले. मात्र ’द स्टोरी ऑफ अस्या कल्यॅचिना’(1967) ही फिल्म सोव्हियेत सत्ताधार्‍यांना न रुचल्याने 20 वर्षे डब्यात पडून होती. घोषित तत्वज्ञान भले कितीही उदात्त असेल पण सत्ताधारी हे सत्ताधारीच उरतात, याचे हे ही एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. तेथून पुढे त्याने अभिजात साहित्यावर चित्रपट निर्मिती करत पॉलिटिकल करेक्टनेस साधला. सोव्हिएत काळातील त्याची ’अंकल वन्या’ (1970) ही रशियामधील एक सर्वोत्कृष्ट फिल्म समजली जाते. त्यांनंतरच्या ’सायबेरियादा’ (1979) मुळे कोंचालवस्की आंतराष्ट्रीय प्रकाशझोतात आला. आणि युरोप आणि हॉलिवूडमधील ’रनअवे टाइम्स’ आणि ’टँगो अँड कश’, ’द इनर सर्कल’ अशी सर्वसाधारण कारकीर्द सुरु झाली. यात त्याने काही ऑपेरा आणि नाटकांचेही दिग्दर्शन केले आहे.

भांडवलवादी हॉलिवूडमध्ये तरी चित्रपटनिर्मितीचे स्वातंत्र्य मिळते का? तर नाही!, असे कोंचालवस्कीचे अनुभवाचे बोल आहेत. ’ज्या क्षणी तुमची कथा कोणी विकत घेतो, त्याक्षणी तो तुम्ही कथा कशा पद्धतीने साकारणार, यावर नियंत्रण ठेवू लागतो. चित्रपट अधिकाधिक बाजारात कसा खपेल? याचा विचार करता करता चित्रपटकर्ता स्वतःच सेन्सॉर बनून जातो, ज्यात रिमोट बाजारकेंद्रित असतो’ यातील शल्य कलात्मकता अंगी मुरलेल्यालाच समजू शकते. नाहीतर यालाच स्वातंत्र्य समजणारे बाजारबनवेही असतातच. निर्माता दिग्दर्शकाला सूचना करू लागतो की ’येथे कॅमेरा का हालत नाही? प्रत्येक शॉटमध्ये कॅमेरा हालता हवा!’ अशा बथ्थडपणास कंटाळून कोंचालवस्की आजच्या रशियास पुन्हा परतला. हॉलिवूडमध्ये न रुळल्याचा त्यास आनंदच आहे.

कोंचालवस्की निर्मात्यांना भेटल्यावर त्यांचे पैसे बुडणार, हे लक्षात घेऊनच पैसे गुंतवा, असे सांगू लागला. अर्थात निर्मात्यांनी मग कोपर्‍यापासून नमस्कार सुरु केले. तेव्हा अलिशेर उस्मानोव्ह ही धनाड्य व्यक्ती त्याच्यामागे खंबीरपणे उभी ठाकली. त्यामुळे कोंचालवस्की अलिशेरबद्दल अतिशय प्रेमाने बोलतो.

रशियातील अलीकडच्या काळातील ’हाऊस ऑफ फूल्स’ (2003), द बॅटल फॉर युक्रेन (2012), ’द पोस्टमन्स व्हाईट नाइट्स’ (2014), पॅराडाईज (2016), डिअर कॉम्रेड्स (2020) या त्याच्या महत्वाच्या फिल्म्स आहेत. त्याच्यावर कधीकधी अमेरिकन वसाहतवादाचा प्रभाव असल्याचीही टीका झाली आहे. तर रशियात काही सोव्हिएत प्रेमी त्याच्यावर सोव्हिएत-द्वेषी असल्याचा ठपका ठेवतात. तो स्वतः मात्र ’मी मनाने सोव्हिएतच आहे’ असा दावा करतो. जीवन खूप द्वंद्वात्मक असून निव्वळ चांगले किंवा निव्वळ वाईट असे काहीच नाही, असे त्याचे अलीकडच्या काळात होत चाललेले आकलन आहे. अलीकडे सरकारी सेन्सॉरशिपबद्दल बेफिकीर राहत तो फिल्म्स बनवतोय, असे तो सांगतो. यावर त्याचे म्हणणे- जर सरकारविरोधी फिल्म केली तर सरकार फार तर प्रमाणपत्र देणार नाही. पण आजच्या डिजिटल इंटरनेटच्या युगात, पैसे परताव्याची अपेक्षा नसेल तर प्रमाणपत्राला अर्थच काय उरतो! नाही मिळाले पत्र तर सरळ ऑनलाइन टाकून द्यायची…

हेही वाचलत का?

Back to top button