

पेण ; पुढारी वृत्तसेवा : गेले पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे व रविवारी रात्रीपासून अधिकच जोरदार पडलेल्या पावसामुळे पेण तालुक्यातील बाळगंगा, पाबळची नदी, अंबा नदी, भोगावती नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. बाळगंगा नदीच्या काठावर असणार्या खरोशी आणि दूरशेत या गावात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी घराघरात पोहोचले आहे. तर दूरशेत येथील डोंगराच्या कडेला असणार्या चार घरांवर 7 ते 8 फूट उंचीचा मातीचा भराव पडला आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.
प्रशासनाने दरड कोसळण्याची भीती व पुराच्या पाण्याचा धोका पाहून भारतीय तटरक्षक दलाला पेणमध्ये पाचारण केले आहे.
त्यांच्यामार्फत पूरस्थितीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. तसेच जोहे, कळवे, तांबडशेत येथील अनेक गणपती कारखान्यांत 2 ते 3 फुटांवर पाणी झाल्याने शेकडो गणपती पाण्यात भिजल्याने नुकसान झाले आहे.
विंधणे ते दिघोडा रस्त्यावर पाणी साचले. गव्हाण फाट्याकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. चिरनेर मार्गावर पाणी साचले. वशेणी दिघाटी मार्गावरील केळवणे रस्त्यावत पाणी साचले. उरण पनवेल मार्गावर जेएनपीटी कॉलनीजवळ रस्त्यावर पाणी साचले.
मुंबई शहर, उपनगरांसह,नवी मुंबई, ठाण्यात सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. सकाळी 11 वाजल्यानंतर पावसाचे पाणी अनेक रेल्वे स्थानकात भरण्यास सुरुवात झाल्याने मध्य रेल्वेच्या मेन लाईनने मान टाकली.त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि इतर प्रवाशांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी अनेक सखल भागात पाणी भरले. मध्य रेल्वेची मेन लाईन,हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पहाटेपासून सुरळीत सुरू राहिली. परंतु सकाळी 11 वाजल्यानंतर विक्रोळी ते कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान पाणी भरल्याने वाहतूक विस्कळीत झाली.त्यातच ठाणे स्थानकातदेखील रेल्वे रुळांवर पाणी आल्याने सीएसएमटी ते ठाणे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली.
दुपारी स्थानकातील पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असले तरी खबरदारी म्हणून या स्थानकादरम्यान लोकलच्या वेगावर मर्यादा आली. दुपारी 3 वाजता कलवा,मुंब्रा स्थानकातील रेल्वेरुळांवर पाणी आल्याने ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिमा मार्ग बंद करण्यात आला.
यादरम्यान प्रवाशांंच्या सोयीसाठी सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा ते कल्याणदरम्यान लोकल सुरू ठेवण्यात आल्या. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास धिम्या मार्गावरील वाहतूक सुरु झाली.परिणामी दिवसभर मध्य रेल्वेच्या मेन लाईनची वाहतूक विस्कळीतच राहिली.
हार्बर मार्ग,पश्चिम रेल्वे,ट्रान्स हार्बर मार्ग आणि नेरुळ ते खारकोपर मार्गावरील वाहतूक सोमवारी दिवसभर विलंबाने पण सुरळीत सुरू राहिली.पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या वाहतुकीलादेखील बसला.काही गाड्यांच्या मार्गात तसेच वेळेत बदल करण्यात आला.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुटणारी 02015 मुंबई-पुणे विशेष गाडी दुपारी तीन वाजता सोडण्यात आली, तर 01111 सीएसएमटी ते मडगाव विशेष गाडी 19 जुलैला रात्री 11.05 वाजता सुटणारी गाडी 20 जुलैला सकाळी 7.10 वाजता सुटणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले.