गोवा : अमित शहा आज काय बोलणार, सर्वांचेच लक्ष? - पुढारी

गोवा : अमित शहा आज काय बोलणार, सर्वांचेच लक्ष?

पणजी; पुढारी वृत्तसेवा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यातील दोन जाहीर कार्यक्रमांमध्ये काय बोलणार? याकडे भाजपच्या नेत्या, कार्यकर्त्यांसह संपूर्ण गोव्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे. गोव्यामध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. सत्ताधारी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार की युती करून निवडणूक लढवणार. याविषयी इतर राजकीय पक्ष आपला अंदाज बांधून राजकीय बांधणी सध्या करत आहेत.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा भाजपचा नैसर्गिक युतीचा भागीदार मानला जातो. भाजप या खेपेला  युती करणार की नाही, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

फॉरेन्सिक विद्यापीठ संकुलाच्या इमारतीची पायाभरणी दुपारी शहा यांच्या हस्ते होणार आहे.पणजीपासून ३० किलोमीटर अंतरावरील धारबांदोडा येथे हा कार्यक्रम असेल. तेथेच ते एका सभेला संबोधित करणार आहेत. दुपारनंतर पंछी लगतच्या ताळगाव येथे शहा कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. या दोन्ही ठिकाणी शहा कोणते वक्तव्य करतात. यावर गोव्याच्या राजकीय वाटचालीची पुढील दिशा ठरणार आहे.

दरम्यान, शहा यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत. भाजपचे राज्य प्रभारी आमदार सी. टी. रवी हे बुधवारी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी काही बैठका घेत कार्यक्रमस्थळी भेटीही दिल्या आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button