Sunburn Goa 2023 : गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न; प्रवास इथेच संपला, हरिंद्र सिंग यांची भावनिक पोस्ट | पुढारी

Sunburn Goa 2023 : गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न; प्रवास इथेच संपला, हरिंद्र सिंग यांची भावनिक पोस्ट

प्रभाकर धुरी

पणजी : जगभरातील संगीत महोत्सवांच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या यादीत स्थान असलेला गोव्याचा ‘सनबर्न’ यंदा अधिकच वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यातच सनबर्नचे आयोजक हरिंद्र सिंग यांनी २०२३ वर्षातला महोत्सव त्यांचा शेवटचा असल्याचे सांगितले. गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न; प्रवास इथेच संपला! अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत त्यांनी ही माहिती दिली.

संबंधित बातम्या –

डिसेंबर २०२३ मधला गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न. हा प्रवास इथेच संपतो…यामध्ये मी अनेकांचा आभारी आहे. या प्रवासात खूप कष्ट, भावना आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. मी मागील इतकी वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो याचा मला आनंद आहे. पण पुन्हा मी ते करू शकणार नसल्याचे दु:खही आहे.” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे कळू शकले नाही.

गेल्यावर्षी १२ वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र यंदा निर्बंध वाढवून फक्त १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. यामुळे खास सनबर्नसाठी म्हणून गोव्यात येणाऱ्यांचा हिरमोड झाला. याचा फटका महोत्सवालाही बसला असण्याची शक्यता आहे. राज्यातील सनबर्नला यावर्षी विरोधकांनी टीकेचे लक्ष्य बनवले होते. गोव्यात सनबर्न नकोच अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर सनबर्न आयोजकांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Back to top button