Goa Ganeshotsav : दहाव्या दिवशी पूजतात राखणेचा गणपती; काय आहे परंपरा?

Goa Ganeshotsav : दहाव्या दिवशी पूजतात राखणेचा गणपती; काय आहे परंपरा?

मडगाव :  संपूर्ण कोंब वाड्याचा राखणदार मानला जाणार्‍या गणपतीचे गुरुवारी दहाव्या दिवशी पूजन केले असून शुक्रवारी अकराव्या दिवशी बापाचे विसर्जन होणार आहे. सुमारे 58 पेक्षा जास्त वर्षे गणपतीचे पूजन केले जात असून यंदाही कोंब-मडगाववासीयांनी परंपरा जपली आहे. श्रींच्या चरणी श्रद्धेने कोंबसहित मडगाव येथील बहुसंख्येने नागरिक येथे सेवा अर्पण करत आहे. (Goa Ganeshotsav)

चतुर्थीच्या ठीक दहाव्या दिवशी कोंब-सकल्लोवाडो येथे बाप्पांच्या भव्य मूर्तीचे पूजन करून अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते. या राखणेच्या गणपतीवर आजही कोंब वाड्यातील लोकांची श्रद्धा कायम असून यंदाही भव्य देखाव्यासह मोठ्या उत्साहात सुमारे 300 ते 400 लोकांनी आवर्जून सहभाग घेत या गणपतीचे पूजन केले आहे.

कोंब वाड्यावरील ज्येष्ठ स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 58 वर्षांपूर्वी वाड्यातील काही मुलांनी एका घरासमोर पहिल्याच वर्षी ही गणेशमूर्ती पूजली होती. त्याच्या काही वर्षांनी त्या मुलांनी नवीन व मोठी मूर्ती पूजल्याने त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. अशाने ही प्रथा वर्षांनुवर्षे चालूच राहिली. एका वर्षी भरपूर पाऊस पडत होता. अशाने हा राखणेचा गणपती बाहेर अंगणात पूजणे शक्य नव्हते. त्याकरिता देवाचा प्रसाद घेऊन हा गणपती कुणाच्या तरी घरात पूजायचे ठरविले. ज्यावेळी पहिल्यांदाच हा गणपती पूजला होता; त्यावेळी त्याला केवळ मोदकांचा प्रसाद अर्पण केला होता. काही वर्षे सरल्यावर हळूहळू याठिकाणी दर्शनाला भाविकांची गर्दी वाढू लागली. लोक या राखणेच्या गणपतीकडे नवस करू लागले. हे नवस पूर्ण झाल्यावर आपल्या खुशीने व ऐपतीप्रमाणे दान करू लागले. महाभोजनास मोठमोठी भांडी, 5-10 किलो कडधान्ये, कधी कधी रोख रक्कम, सोन्याचा कडा, सोन्याची अंगठी इत्यादी नवस पूर्ण झाल्यावर देऊ लागले. ही पद्धत आजही चालूच आहे. आता दोन्ही दिवशी गणपतीला महाभोजनाचा प्रसाद अर्पण केला जातो. या दोन्ही दिवशी या महाभोजनास वाड्यावरील लोकांची गर्दी होते. (Goa Ganeshotsav)

फुगडी कार्यक्रमांनी उत्साह

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना ते उत्तरपूजा गोपाळ राणे यांच्या हस्ते करण्यात येते. गणपती पूजनानंतर दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणाची पूजा घातली जातेे. याच मंडपात संध्याकाळी 30 ते 40 स्त्रियांनी मिळून फुगड्या घातल्या. पुरुषांनीही यात सहभाग घेता होता. या फुगड्यांची गीते पारंपरिक कोंकणी भाषेत होती. यावेळी कोंब तसेच मडगावचे नागरिक सहभागी झाले होते.

आज विसर्जन मिरवणूक

फुगड्या झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. शुक्रवारी अकराव्या दिवशी रात्रीचा महाप्रसाद झाल्यावर कोंब येथील राखणेच्या बापांची विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती स्थानिकांनी पुढारीशी बोलताना दिली आहे. (Goa Ganeshotsav)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news