

पणजी, पुढारी वृत्तसेवा : पर्वरीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास मंत्री, आमदार रोहन खंवटे हेच जबाबदार आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे स्थायी निमंत्रक गिरीश चोडणकर यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषदेत केला. (Goa Politics)
गिरीश चोडणकर यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत बोलत असताना आमदार रोहन खंवटे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "मंत्री रोहन खंवटे यांनी त्वरित राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ डच्चू द्यावा. पर्वरीतील गुंडागिरीवर पर्वरी फाइल्स नामक चित्रपट काढण्यात यावा, गुन्हेगारीची खूप प्रकरणे उघडी पाडू.
पुढे बोलत असताना ते म्हणाले की, पर्वरी परिसरात प्रचंड प्रमाणात गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे आणि निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाला मंत्रीच जबाबदार आहेत. (Goa Politics)
संबधित बातम्या
पर्वरीत वकील व न्यायमूर्ती सुद्धा सुरक्षित नाहीत. नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहन खंवटे यांनी राजीनामा द्यावा. यापूर्वी गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांताक्रूझचे आमदार रूडाल्फ फर्नांडिस यांना जशी सुधारण्याची संधी देण्यात आली तशीच संधी आता रोहन खंवटे यांना देण्यात येत असून, आता तरी त्यांनी सुधारावे. पर्वरी व गोव्याचे नाव खराब होण्यापासून राखावे. अशी हात जोडून गिरीश चोडणकर यांनी विनंतीही केली.
पर्वरीतील गुंडगिरीवर मुख्यमंत्र्याचे मौन आहे. गृहमंत्री म्हणून ते आपल्या पदाला न्याय देत नाहीत. फुटीर आमदारांना परत पक्षात संधी नाही. सभापतींवर दबाव असून अपात्रता याचिका ठप्प आहे. त्यांना अजून नोटिसा नाहीत. उच्च न्यायालयाचा आदेशही धाब्यावर बसवला आहे. असे म्हणत त्यांनी निशाण साधला. काँग्रेस पक्ष सोडणार नाही अशी देवाला स्मरून शपथ घेणाऱ्यांनी देवाला फसवले आणि भाजपत प्रवेश केला. वर्ष झाले तरी त्यांच्या पदरी ठेंगाच आहे. त्याचबरोबर मंत्रीच पोलीस स्थानकावर मोर्चा आणतात. पोलिसांच्या कारभारात थेट राजकीय हस्तक्षेप केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
हेही वाचा