नांदेड: जगदंबातांडा येथे मृत्यूनंतरही देहाची परवड; मृतदेह नेण्यासाठी झोळीचा आधार | पुढारी

नांदेड: जगदंबातांडा येथे मृत्यूनंतरही देहाची परवड; मृतदेह नेण्यासाठी झोळीचा आधार

किनवट, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या जगदंबातांडा नावाच्या छोट्या वस्तीला जाण्यासाठी वारंवार मागणी करूनही पक्का रस्ता करून न मिळाल्यामुळे मंगळवारी (दि.८) मृतदेहाला झोळीतून गावात न्यावे लागले. याचे पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

जगदंबा तांडा येथे 25 ते 30 कुटूंबांची लोकवस्ती आहे. किनवट शहरापासून अंबाडी हे गाव सुमारे 10 कि.मी. अंतरावर असून, तेथून दीड ते दोन कि.मी.अंतरावर उंच डोंगरावर जगदंबा तांड्याची 25 ते 30 कुटुंबांची लोकवस्ती आहे. अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुर अशी या तांड्याची ओळख आहे. गावाला अंबाडीकडून जा-ये करण्यासाठी कच्चा रस्ता आहे. तर दुसरा एक पायवाटेचा रस्ता माहूर मार्गावरील कमठाला येथे जातो.

एका तरुणाचे पार्थिव जगदंबातांड्याकडे आणताना कमठाल्याजवळील रोहीदासतांड्याकडून त्यास झोळीद्वारे पायवाटेने डोंगरावर नेण्यात आले. कारण अंबाडीकडील रस्त्यावर एकतर पावसामुळे प्रचंड चिखलाचा राडा झाला होता.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही काही गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, हीच गोष्ट मनाला खटकणारी व यातना देणारी आहे. सोबतच प्रशासनाच्या व राजकारण्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. जगदंबा तांड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने सर्वत्र चिखल, दलदल झाली आहे. यापूर्वी तांडावासियांनी गावातील रस्ता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु, दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किमान आता तरी आम्हाला रस्ता करून द्यावा, अशी मागणी जगदंबा तांडा इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button