

मडगाव पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्याच्या धारबांदोडा येथें गुन्हा अन्वेषण विभागाने धाड टाकुन १२० जिलेटीनच्या कांड्या आणि सुमारे ३०० डेटोनेटर्स असलेली कार पकडली आहे. बुधवारी (दि.२०) मध्यरात्री घातलेल्या या धाडी मुळे दक्षिण गोव्यात खळबळ माजली असून, ही सर्व स्फोटकांचे कनेक्शन सावर्डेतील गुड्डेमळ येथे आहे. (Goa )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलेटीनच्या १२० कांड्या आणि सुमारे ३०० डेटोनेटर्स बाळगल्याप्रकरणी मोहम्मद तांबोळी (३५) आणि भुजंग बाळा खटावळ (३२) अटक करण्यात आली आहे. हे दोघेही महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. डेटोनेटर्सचे सहा बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ही स्फोटके सावर्डे भागात बेकायदेशीर पाषाणाची खाण चालवणाऱ्या व्यवसायिकाकडे नेली जात होती. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर रामानन यांनी पथकासह ही कारवाई राबवली. बाजारपेठेत या स्फोटकांची किंमत सुमारे पन्नास हजार येवढी आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सावर्डे भागात राजेंद्र नामक व्यक्ती पाषाणाच्या खाणी चालवत आहे. जिलेटीनचे स्फोट घडवून दगड फेडण्यास मनाई असतानाही सांतोंण येथील खाणीत जिलेटीनचे स्फोट घडवले जात आहेत. दैनिक पुढारीने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर खाण खात्याने करवाई केली होती; पण पावसाचा फायदा उठवत त्याने पुन्हा जिलेटीनचा वापर सुरु केला होता. महाराष्ट्रातून मागवण्यात आलेली ही स्फोटके दगडाच्या खाणीत वापरली जाणार होती, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी निरीक्षक लक्षी आमोणकर तपास करत आहेत.
हेही वाचा