दक्षिण गोव्यातील दूधसागर धबधबा केवळ गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरील गिर्यारोहकांमध्येही बराच प्रसिद्ध आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पावसाळ्यात देशाच्या कानापकोर्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. परंतु, अलिकडच्या काळात पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे या पर्यटनस्थळाला गालबोट लागत आहे. (Dudhsagar Falls)
दूधसागर धबधबा परिसर हा संवेदनशील भागात येतो. मौलिक जैवसंपदा आणि वन्यप्राण्यांचा अधिवासही या भागात आहे. अशा पर्यटनस्थळावर शांतता भंग होता कामा नये. निसर्गाची मजा लुटताना गोंधळ माजला की मग त्याचे पडसाद जैवसृष्टीवर उमटतात. (Dudhsagar Falls)
कॅसलरॉक तसेच कुळे ही दुधसागरच्या नजीकची रेल्वस्थानके असल्याने पर्यटक येथे उतरतात आणि गुपचुप रानवाटेतून धबधब्याच्या ठिकाणी जातात. हे धोकादायक आहे. रेल्वेनेही सुरक्षिततेच्या कारणास्तव असे स्वैरपणे फिरण्यावर बंदी घातली आहे. असे कोणी भटकताना आढळल्यास तो दंडनीय गुन्हा आहे. रविवारी (दि.१६) दूधसागर धबधब्याच्या परिसरात उतरलेले हजारो पर्यटक बोगस गाईडच्या मार्गदर्शनावरून आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पावसाळ्यात दूधसागर नदीला पूर येत असल्याने पर्यटकांना धबधब्यावर नेणार्या जीपगाड्या बंद ठेवाव्या लागतात. पुराचे पाणी ओसरेपर्यंत आणि पाण्याचा प्रवाह कमी होईस्तोवर ही बंदी कायम असते. पण पायी चालत दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्याचा दुसरा पर्याय पर्यटकांसमोर खुला असतो.
कुळे रेल्वे स्थानकावर उतरून रेल्वे मार्गाने धबधब्यावर जाता येते. हा मार्ग उतरण आणि चढणीचा आहे. या भागात काही किलोमीटर रेल्वेची धावगती अगदी धिमी असते. हीच संधी साधत तरुण पर्यटक पटापट उतरतात आणि धबधब्यावर जातात. मात्र पुन्हा रेल्वे पकडण्यासाठी त्यांना कुळे येथे जावे लागते.
पावसाळ्यात जंगलातून पायी जाण्यासाठी हजारोंच्या संखेने पर्यटक येतात. सरकारच्या अनास्थेमुळे 'ओरिसा'सारखे परप्रांतीय गाईड आपली दुकाने चालवू लागले आहेत. ओरिसा हा परप्रांतीय इसम बर्याच वर्षांपासून कुळे येथे वास्तव्याला आहे.
पावसाळ्यात रेल्वे किंवा जंगलमार्गाने पर्यटकांना दूधसागर धबधब्याची सफर करून आणण्यासाठी ओरिसा परिचित आहे. दूधसागरला येणार्या प्रत्येक पर्यटकंच्या तो जवळचा बनला आहे. दर व्यक्तीच्या मागे साडेचार हजार रुपये शुल्क आकारणारा ओरिसा स्वतःची सरकारी गाईड अशी ओळख करुन देतो. रविवारी कुळेत उरलेल्या हजारो पर्यटकांना त्यानेच निमंत्रित केल्याची माहिती सामोर आली आहे.
गिर्यारोहणाबरोबरच वर्षा पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना तो आणि त्याचे साथीदार गुपचूप दूधसागर धबधब्याची सफर घडवून आणत आहेत. पर्यटन स्थळांच्या बाबतीत माहिती पुरवणार्या संकेतस्थळांवर सुध्दा या बोगस गाईड्सचे फ़ोन क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटक थेट त्यांच्याशी संपर्क साधून दूधसागरावर प्रवेश करत आहेत. (Dudhsagar Falls)
कुळे रेल्वे स्थानकावर प्रवेश करताच त्यांना मालगाडीच्या शेवटच्या डब्यात बसवून धबधब्यावर नेले जाते. कुळे ते कॅसलरॉक या मार्गावर धावणार्या प्रत्येक रेल्वेगाडीची गती दूधसागराजवळ कमी केली जाते आणि तीच संधी साधून पर्यटकांना त्याठिकाणी उतरवले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पर्यटकांचा जीव धोक्यात घालणार्या या 'ओरिसा'वर पोलिसांत तक्रारी सुध्दा दाखल आहेत.
स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांना व्यवस्थित मार्गदर्शन व्हावे म्हणून गावातील ११० जणांना गाईड म्हणून खास प्रशिक्षणही देण्यात आले होते. पण अंतर्गत राजकारणाचा फटका या पर्यटनस्थळाला बसू लागला आहे. पावसाचे निमित्त पुढे करून यंदा दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने त्या ११० जणांवर उपासमरीची वेळ आली आहे. शिवाय ही संधी बोगस गाईड उठवू लागले आहेत. प्रत्येक पर्यटकाकडून दोन ते पाच हजारापर्यंत रुपये आकारणार्या अवैध गाईड्सची जोरदार कमाई होऊ लागली आहे.
– स्थानिक गाईड उपाशी, एजंट तुपाशी
पावसाळ्यात धबधबा बंदच करायचा होता, तर गावातील ११० जणांना गाईड म्हणून प्रशिक्षण का देण्यात आले? वन खात्याने त्यांना ओळखपत्रेही दिलेली आहेत. धबधबा बंद करून सरकारने त्या ११० जणांच्या पोटावर लाथ मारली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टीचे आठ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. वन खात्याचे पंधरा कर्मचारी आहेत. शिवाय आयआरबीचे चार पोलिस ही नेमण्यात आले आहेत. शिवाय वन खाते प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी शंभर रुपये शुल्क वसूल करत आहेत. गेल्या वर्षी सरकारला ७० लाख रुपये एवढा महसूल प्राप्त झाला होता.
– मनीष लांबोर, माजी सरपंच कुळे
हेही वाचा;