विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील मानोली (Manoli Dam) व पालेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्प मंगळवारी दि १८ रोजी ओव्हर फ्लो होऊन प्रवाहित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तर निनाई परळे येथील कडवी धरणाची ५० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय पुनदीकर यांनी दिली.
पावसाने उशिरा सुरुवात केल्याने कडवी धरणासह मानोली, (Manoli Dam) कासारी, पालेश्वर या धरणाची पाणी पातळी कमालीची घटली होती. पाटबंधारे विभागाच्या योग्य नियोजनामुळे ३० जूनअखेर कडवी धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे कडवी काठावरील गावांना यंदा सिंचन व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र पावसाने जशी ओढ दिली तसा कडवी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. पावसाने १ जुलैपासून सुरुवात केली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे यंदा धरणे भरतात की नाही असा प्रश्न निर्माण होत असताना पावसाची संततधार सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
मानोली लघु प्रकल्प प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४.९७ दलघमी इतकी आहे. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पाण्यासाठ्यात वाढ होऊन सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्याने तो अखेर सोमवारी सायंकाळी ओव्हर फ्लो झाला. सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्याने मानोली धबधबा कोसळू लागला आहे. पर्यटकांची येथे गर्दी वाढू लागली आहे. पालेश्वर धरणाची पाणी साठवण क्षमता ८.५५ दलघमी इतकी आहे. तो मंगळवारी सकाळी ओव्हर फ्लो झाला आहे. येथेही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी इतकी असून धरण ४८.२७ टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी ५९२.२० मी असून उपयुक्त पाणीसाठा ३४.३८ दलघमी इतका आहे. धरण १.२१ टीएमसी भरले आहे. ४४ दलघमी पाणीसाठ्यात वाढ झाली असून गत २४ तासांत ६५ मिमी पाऊस बरसला. १ जूनपासून आजअखेर ९७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी १७२९ मिमी पाऊस झाला होता. धरण गतवर्षी १८ जुलैला ८० टक्के भरले होते. धरणातून कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
मानोली धरण ओव्हर फ्लो झाल्याने येथील धबधबा कोसळू लागला आहे. गतवर्षी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे येथे एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता. असे प्रकार घडू नये म्हणून जलसंपदा विभागाने धबधब्याच्या ठिकाणी फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे. पर्यटकांनी प्रवाहाजवळ जाण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःसह, मित्र परिवार तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी.
– अजय पुनदीकर, शाखा अभियंता, कडवी धरण
हेही वाचा