चंद्रपूर: बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार | पुढारी

चंद्रपूर: बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: रोवणीकरीता चिखलटी झाल्यानंतर शेतात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. हा हल्ला परतावून लावण्याकरीता धावून आलेल्या एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आज (दि.१८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव शेतशिवारात घडली. ऋषी किसन देवतळे (वय 60, रा. बाम्हणगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव वसले आहे. ऋषी देवतळे यांचे बाम्हणगाव पासून 2 किमी अंतरावर शेत आहे. बफर झोनमधील जंगल लागून आहे. आज त्याच्या शेतात रोवणी सुरू असल्याने तो बैलजोडी घेऊन रोवणी करण्याकरीता गेला होता. तसेच शेतात महिलाही उपस्थित होत्या. दुपारपर्यंत बैलाच्या सहायाने रोवणीचे काम केल्यानंतर चारा चारण्याकरीता बैलांना मोकळे सोडण्यात आले. शेतशिवारातच बैल चरत असताना अचानक सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाघाने बैलावर हल्ला चढविला.

बैलाला वाचविण्यासाठी शेतकरी पुढे गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कोलारा वन परिक्षेत्राधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या पंधरवाड्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे शेतकरी शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम सुरू आहे. अशातच वाघांच्या हल्यात मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडत असल्याने रोवणीच्या हंगामावर संकट आले आहे.

हेही वाचा 

Back to top button