Drugs Seized In Goa : गोव्यात २५ लाखांचे ड्रग्ज जप्त; हणजूण येथे एनसीबीची कारवाई | पुढारी

Drugs Seized In Goa : गोव्यात २५ लाखांचे ड्रग्ज जप्त; हणजूण येथे एनसीबीची कारवाई

पणजी; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पथकाने हणजूण येथे तब्बल 25 लाख़ रुपयांचा एलएसडी ड्रग्ज जप्त केला. राज्यात अमली पदार्थाचा (ड्रग्ज) व्यवसाय झपाट्याने वाढत असून त्यावर नियंत्रण़ासाठी गोवा पोलिसांचे विविध विभागही सक्रिय झाले आहेत. मागील सहा दिवसांत राज्यात सुमारे 60 लाख रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. (Drugs Seized In Goa)

मंगळवारी (दि.2) एनसीबीच्या पथकाने हणजूण येथे छापा टाकून 25 लाख़ांच्या एलएसडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक केली. त्याचसोबत 32 हजार रुपये रोख, 18 युएस डॉलर, 38,210 श्रीलंकन चलन व विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले. (Drugs Seized In Goa)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या पथकाने मध्यरात्री हणजूण येथे टाकलेल्या छाप्यात ड्रग्ज तयार करणाऱी लॅब उध्वस्त करून 25.17 लाख किमतीच्या एलएसडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक केली. (Drugs Seized In Goa)

हणजूणमध्ये एक घर भाड्याने घेऊन संशयित ए. कांदू (मूळ रा. पश्चिम बंगाल) हा त्या घरात छुप्या पद्धतीने ड्रग्ज तयार करत होता. ही माहिती एनसीबी पथकाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत पथकाने घरावर छापा टाकला व आरोपीला ड्रग्जसह ताब्यात घेतले.

परराज्यातही ड्रग्जचा पुरवठा

कांदू हा गोव्यासह देशातील इतर राज्यांमध्येही ड्रग्ज पुरवत असल्याचे समोर आले आहे. या छाप्यात पथकाला तब्बल 25.17 लाखांचा मुद्देमाल ड्रग्ज सापडला. यात एलएसडी ब्लोस्टर्स, एमडीएमए पावडर, हाशीश मोईस्टर पावडरचा समावेश आहे. या संशयितासह अजून कुणाचा यात सहभाग आहे का याचा पोलिस तपास करत आहेत.

सलग दुसरा छापा

चार दिवसांपूर्वी एनसीबीने गोव्यात सुरू असलेल्या रशियन ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला होता. ज्यामध्ये रशियातील माजी ऑलिंपिक पदक विजेती जलतरणपटू स्वेतलाना, रशियातील निवृत्त पोलिस कर्मचारी आंद्रे आणि गोव्यातील आकाश नावाच्या व्यक्तीला अटक करून त्यांच्याकडून 30 लाखांच्या ड्रग्जसह एकूण 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

वागातोर येथे 1.5 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

हणजूण – वागातोर येथे सोमवारी (दि.1) रात्री गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 1.5 लाखांच्या ड्रग्जसह दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. पोलिसांनी विक्रम उप्पर ( वय 21, दांडेली, कर्नाटक) व साहील उज्जानिया (वय 26, माटुंगा, महाराष्ट्र) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 5 हजार रुपयांचा 1.5 किलो गांजा जप्त केला.

अधिक वाचा :

Back to top button