इफकोचे नॅनो डीएपी खत हे आत्मनिर्भर भारतासाठी महत्वाचे पाऊल, केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांचे गौरवोद्वगार | पुढारी

इफकोचे नॅनो डीएपी खत हे आत्मनिर्भर भारतासाठी महत्वाचे पाऊल, केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांचे गौरवोद्वगार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: इफको कंपनीने तयार केलेला नॅनो डीएपी (द्रवरुप) खत हे सर्व सहकारी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत असून भारताला या क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याची ही महत्वपूर्ण सुरुवात आहे. तसेच समृध्द आणि आत्मनिर्भर भारत स्वप्न साकारण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे गौरवोद्वगार केंद्रिय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड तथा इफको कंपनीच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये शहा यांच्या हस्ते इफको कंपनीने विकसित केलेल्या नॅनो डीएपी (द्रवरुप) खताचे नुकतेच उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे अध्यक्ष दिलीप संघानी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी उपस्थित होते.

देशातील एकूण खत उत्पादन 384 लाख मेट्रिक टन झाले आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांनी 132 लाख मेट्रिक टन उत्पादन केले आहे. त्यामध्ये एकट्या इफको कंपनीचा वाटा 90 लाख मेट्रिक टन असून भारताच्या स्वावलंबनात इफकोचे मोठे योगदान असल्याचेही शहा म्हणाले.

इफको कंपनीचे अध्यक्ष दिलीप संघानी यावेळी म्हणाले, नॅनो डीएपी लिक्विड तयार करण्यात आले आहे. सहकारातून समृद्धी आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेशी सुसंगत असून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना चांगले भविष्य देणे हे उद्दिष्ट आहे.

इफकोेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी म्हणाले की, नॅनो डीएपी (लिक्विड) हे पर्यावरणपुरक उत्पादन असून पिकांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी प्रभावी ठरु शकते.

नॅनो डीएपीची वैशिष्ट्ये

* इफ्कोने डीएपीच्या उत्पादनासाठी गुजरातमधील कलोल, कांडला आणि ओरिसातील पारादीप येथील प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरु झाले आहे
* पारंपारिक डीएपीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
* डीएपीची 50 किलोची एक बॅग 1350 रुपयांस असून नॅनो डीएपीची (लिक्विड) एक बाटली फक्त 600 रुपयांमध्ये मिळेल.

* पिकांची उत्पादकता वाढीबरोबरच वाहतूक आणि साठवणूक खर्चात बचत.

Back to top button