गोवा : पर्यटकांच्या समुद्रस्नानाची छायचित्रे घ्याल तर खबरदार; कारवाई होणार | पुढारी

गोवा : पर्यटकांच्या समुद्रस्नानाची छायचित्रे घ्याल तर खबरदार; कारवाई होणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पर्यटन खात्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये समुद्रस्नान करणाऱ्या अनोळखी व्यक्ती किंवा अन्य पर्यटकांची छायचित्रे किंवा सेल्फी घेऊ नयेत, अशी सूचना देण्यात आली आहे. याशिवाय अन्य १३ सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये दारू न पिणे, उघड्यावर स्वयंपाक न करणे यांचा समावेश आहे.

खात्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पर्यटन व्यवसायात पारदर्शकता यावी, यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे हाही या सूचनांचा हेतू आहे. याबाबत पर्यटन मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर हॉटेल्समध्येच आरक्षण करणे, खासगी वाहने भाड्याने न घेणे यांचा समावेश आहे.

याशिवाय बेकायदेशीर दलालांकडून जलक्रीडांचे तिकीट न घेणे, भीक न देणे, कचरा न टाकणे, किनाऱ्यांवर वाहने न चालवणे, अंमली पदार्थांचे सेवन न करणे, संशयास्पद ऑनलाइन पोर्टलवरून सेवा बुक न करणे, खडकाळ ठिकाणी सेल्फी न घेणे, वारसा स्थळांसह विद्रुपीकरण न करणे आणि मीटर टॅक्सीचा आग्रह धरणे यांचा समावेश आहे.

हे वचलंत का? 

Back to top button