सोनाली फोगाट खून प्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल | पुढारी

सोनाली फोगाट खून प्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल

पणजी : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या तथा टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा गोव्यातील हणजूण येथे ड्रग्ज पाजून खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांचे सहकारी संशयित सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

सोनाली फोगाट या सांगवान आणि सिंग यांच्यासह 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या. ते सर्व ग्रॅण्ड लिओनी हॉटेलमध्ये उतरले होते. दुसर्‍याच दिवशी त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी फोगाट यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सांगवान व सिंग यांना अटक केली होती. दोन्ही संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, तेथे न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सोनाली फोगाट कुटुंबियांच्या मागणीनुसार हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी सीबीआयच्या दिल्ली विशेष विभागाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302, आरडब्ल्यू 36 व 34 अंतर्गत चौकशी सुरू करून तपास पूर्ण केला. सीबीआयने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात सांगवान आणि सिंग या दोन्ही संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

तिघांना मिळाला होता सशर्त जामीन 

सोनाली फोगाट खून प्रकरणाशी निगडित ड्रग्स प्रकरणी तिचे सहकारी सुधीर पाल सांगवा व सुखविंदर सिंग या दोघांना हणजूण पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल करून अटक केली होती. या दोघांना ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी हॉटेल ग्रॅण्ड लिओनीचा रूम बॉय दत्तप्रसाद गावकर आणि रामदास उर्फ रामा मांद्रेकर यांच्यासह कर्लिस क्लबचे एडविन नुनीस याच्या विरोधात अमलीपदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 27 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

या प्रकरणात दत्तप्रसाद गावकर, रामदास उर्फ रामा मांद्रेकर याच्यासह कर्लिस क्लबचे एडविन नूनीस या तिघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

.हेही वाचा  

हिगोंली : राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

प्रेक्षकांना काय आवडते हेच कळेना

Messi : सौदी अरेबियाविरूद्धच्या सामन्यात मेस्सीला अनोखा ‘विक्रम’ करण्याची संधी

Back to top button