आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश, गोव्यातून काँग्रेस छोडो आंदोलन सुरू

आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश, गोव्यातून काँग्रेस छोडो आंदोलन सुरू
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसमधील अकरापैकी आठ आमदारांनी आज सकाळी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पणजी येथील भारतीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल होऊन रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस दामोदर नाईक, ॲड. नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेस सोडलेले आठ आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे याने दिगंबर कामत, मायकल लोबो आलेक्स सिक्वेरा व काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांना पुष्पगुच्छ देऊन, पक्षाची पावती देऊन आणि भाजपचा शेला प्रदान करून रीतसर भाजपमध्ये प्रवेश दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेला गोव्यातून काँग्रेस छोडो अभियानाने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हे अभियान आता देशभर यशस्वी होणार आहे . कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे नेतृत्व गुण नाहीत, या उलट भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व गुणसंपन्न बलशाली नेतृत्व या देशाला लाभले आहेत. त्यामुळे भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे. त्याचाच परिपाक म्हणून गोव्यातील आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

येत्या काळात इतर राज्यांतील अनेक नेतेही भाजपमध्ये दाखल होतील आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ४०० हून अधिक जागी विजय मिळून नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एखादा नेता वा व्यक्ती परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो. काँग्रेसकडे राष्ट्रीय नेतृत्व नाही आणि गोव्यातही नेतृत्व नाही, हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जे पत्र लिहिले आहे त्या पत्रामध्ये काँग्रेसची दशा दर्शवण्यात आलेली आहे, असे दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले .

दरम्यान आज जे ८ आमदार भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्या आठ पैकी पाच आमदार हे पुर्वी भाजपशी सलग्न होते. दिगंबर कामत हे तीन वेळा भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. तर मायकल लोबो हे भाजपच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आले होते. मागील मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते. डिलायला लोबो या भाजपच्याच प्रदेश उपाध्यक्षा होत्या. तर केदार नाईक व राजेश फळदेसाई हे भाजपचे सदस्य होते. रुडाल्फ फर्नांडिस, संकल्प अमोणकर व आलेक्स सिक्वेरा हे कट्टर काँग्रेसचे होते. तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत .

पुन्हा एकदा भाजपकडे २८ आमदार…

तीन वर्षापूर्वी काँग्रेसमधील १५ पैकी दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तीन वर्षानंतर आज पुन्हा काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदार भाजप दाखल झाले. निवडणुकीपूर्वी भाजपकडे २७ आमदार होते. मात्र निवडणुकीत भाजपला २० जागी विजय मिळाला होता. आता आठ आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपकडे २८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. मगो पक्षाचा एक व तीन अपक्ष यांच्या पाठिंब्यामुळे भाजपकडे आता तब्बल ३२ आमदारांचे पाठबळ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news