उस्‍मानाबाद : लोहारा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित | पुढारी

उस्‍मानाबाद : लोहारा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित

लोहारा, पुढारी वृत्तसेवा :  १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होऊनही उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारासह तीन तालुके अतिवृष्टी अनुदानातून शासनाने वगळले आहे. १०० टक्के नुकसान होऊनही अनुदान न मिळाल्याने या तीन तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित पिकांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला ९० कोटी ७४ हजार लाख रुपये मंजूर झाले आहेत; परंतु या अनुदानातून लोहारा, भूम, वाशी, तीन तालुक्यांना वगळण्यात आले आहे. अनुदान मिळेल या अपेक्षेने बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची शिंदे-फडवणीस सरकाराने अपेक्षाभंग केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात नुकसान झाले असताना हे तीन तालुके वगळण्यामागे कोणते षडयंत्र रचले जात आहे, अशी नागरिकांच्यात चर्चा आहे.

८ सप्टेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढत, महसूल व वन विभागाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने व सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाणी वाहून गेल्याने काहीच्या शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. काही शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली. तर काही ठिकाणी वीज कोसळून माणसे मृत्यूमुखी पडली.

एवढे पावसाचे रौद्ररूप असताना देखील लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळू शकत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसामुळे नुकसान झाले असताना, राज्य शासनाने मात्र आठ तालुक्यापैकी केवळ चार तालुक्यांनाच अनुदान जाहीर केले आहे. मात्र उर्वरित चार तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

Back to top button