मुंबई : शक्य असेल तेथे मविआचा संयुक्त उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती | पुढारी

मुंबई : शक्य असेल तेथे मविआचा संयुक्त उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शक्य असेल तेथे शिंदे गट आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक झाली. राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न करणार आहे. आघाडीतील तीन पक्षांसह समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्षालाही सोबत घेतले जाईल. या पक्षांसोबत चर्चा करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिलेले आहेत. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी आघाडी करून शिंदे गट आणि भाजपची कोंडी केली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची त्यांची भूमिका जाणवली, असे जयंत पाटील म्हणाले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या प्रश्नावर विरोधकांनी एकत्र येऊन आक्रमकपणे आपली भूमिका बजवावी, असे आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत दिले आहेत. गणेशोत्सवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीला घेण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

Back to top button